कार पार्किंग केली, तो परत येईल म्हणून त्याची वाट पाहत होते, पण…
तो नेहमीप्रमाणे कामावर गेला. आपले काम करण्यात व्यस्त होता. इतक्यात मोठा आवाज झाला म्हणून सर्वजण धावत आले. समोरील दृश्य पाहून सारेच हादरले.
मुंबई : इमारतीतील स्टॅक पार्किंग कॉलम अंगावर कोसळल्याने एका हाऊसकिपिंग कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना चेंबूरमध्ये सोमवारी दुपारी घडली आहे. मयत इसमाची ओळख अद्याप पटली नाही. वरच्या बाजूला जड SUV उभी असल्याने पार्किंग गॅरेज कोसळले. पोलीस व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. घटना घडल्यानंतर तात्काळ पोलीस आणि अग्नीशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्नीशमन दलाने अथक प्रयत्नांनी गाड्यांखाली दबलेला मृतदेह बाहेर काढला. मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होता. मृतदेह बाहेर काढत रुग्णालयात नेण्यात आला.
दुपारी अचानक मोठा आवाज आला अन्…
चेंबूरमधील स्वस्तिक फ्लेअर इमारतीत दुपारी सर्वजण जेवून झोपले होते. इतक्यात पार्किंग परिसरात मोठा आवाज झाला. आवाज ऐकून इमारतीतील आणि आजूबाजूचे लोक धावत आले. पाहतात तर इमारतीतील स्टॅक पार्किंग कोसळले होते. तर त्याखाली इमारतीतील हाऊस किपिंगचे काम करणारा एक कामगार दबला होता.
अथक प्रयत्नांनी मृतदेह बाहेर काढला
इमारतीतील लोकांनी तात्काळ अग्नीशमन दलाला पाचारण केले. अग्नीशमन दल आणि रहिवाशांनी धातूच्या स्ट्रक्चरमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले. कोणीतरी बटण दाबल्यानंतरच लिफ्ट थोडी वर सरकली आणि मृतदेह बाहेर काढणे शक्य झाले. यानंतर इमारतीत राहणाऱ्या एका डॉक्टरने व्यक्तीला मृत घोषित केले.
स्टॅकच्या वर एक जड SUV उभी होती.त्यामुळे जास्त वजनामुळे स्टॅक कॉलम कोसळला. जड वाहने कधीही वरच्या बाजूला पार्क करू नयेत. पण ही खबरदारी अनेकांना माहिती नाही. तसेच, अशा सर्व लिफ्टची नियमित देखभाल केली पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.