Mumbai Crime : दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडताय ? मोबाईल चोरांपासून रहा सावध, बोरिवलीत चोरट्यांचा सुळसुळाट, तिघांना अटक
खरेदीसाठी बाजारात जाताना जास्त सावध राहण्याची गरज आहे. कारण वाढत्या गर्दीचा फायदा घेऊन लोकांना लुटणाऱ्यांचंही यावेळी खूफ फावतं.
गोविंद ठाकूर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 10 नोव्हेंबर 2023 : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात झुंबड उडाली आहे. कपडे, फटाके, रांगोळी, मिठाई, आकाशकंदील… एक ना अनेक गोष्टींच्या खरेदीसाठी लोकं बाजारात गर्दी करत आहेत. मात्र या खरेदीसाठी बाजारात जाताना जास्त सावध राहण्याची गरज आहे. कारण वाढत्या गर्दीचा फायदा घेऊन लोकांना लुटणाऱ्यांचंही यावेळी खूफ फावतं. मोबाईल चोरणाऱ्या टोळीतील अशाच तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून अनेक मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
बोरिवली येथे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शहरात सध्या दिवाळीनिमित्त अनेक ठिकाणी रोषणाई करण्यात आली. विविध दुकानात नवनवीन कपडे, मोबाईल्स, गृहपयोगी वस्तू, सजावटीचे सामान हे विकत घेण्यासाठ ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे. बोरीवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसव्ही रोडवर देखील दिवाळीच्या खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी असते. मात्र याच गर्दीचा फायदा घेत बसस्थानक परिसरात अनेक लोकांचे मौल्यवान मोबाईल लांबवण्यात आले.
बोरिवलीत मोबाईल चोरणारी टोळी फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. अखेर तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. वसीम रईस अहमद शेख उर्फ मसा (वय 30), भेटा तुळशीराम शिंदे (वय 23) आणि निलेश जगदीश पटेल उर्फ कन्या (वय 32) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या तिनही चोरट्यांकडून 5-10 नव्हे तर 27 मोबाईल जप्त केले आहेत. या सर्व मोबाईल्सची किंमत सुमारे दोन लाख रुपये इतकी आहे. हे तिघेही सराईत चोरटे असून त्यांच्याविरोधात मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात मोबाइल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
बसमधील गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल पळवणाऱ्यांना अटक
यापूर्वी मुंबई पोलिसांनी अशीच कारवाई करत तीन गुन्हेगारांना अटक केली. हे तिघेही आरोपी गर्दीने भरलेल्या बसमध्ये चढून, संधीचा फायदा घ्यायचे आणि प्रवाशांचे मोबाईल लुटून फरार व्हायचे. शोएब मोबीन खान (21), बैतुल्ला कलामुद्दीन खान (36) आणि नादिर शेख (38) या तिघांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण 32 मोबाईल्स जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. हे तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी गर्दीने भरलेल्या बसमध्ये चढायचे आणि गर्दीचा फायदा घेत मोबाईल पळवायचे. पोलिसांनी प्रथम शोएब आणि बैतुल्लाला पकडले. मात्र त्यांनी चोरलेले फोन हे नादिर याच्याकडे विकल्याची माहिती चौकशीतून मिळाली. तर नादिरने तेच फोन बादारात पुन्हा स्वस्त विकल्याचे कबूल केले, असे पोलिसांनी नमूद केले. नादिरच्या घरावर छापा टाकल्यानंतर पोलिसांनी तब्बल 32 मोबाईल जप्त केले.