Mumbai News : लोकलमध्ये तरूणीची दादागिरी, टीसीची कॉलर पकडण्यापर्यंत मजल गेली कशी ?
धावत्या लोकलमध्ये एका टीसीला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकलमधील तरूणीच्या या वर्तनाने सर्वच प्रवासी हादरले. याप्रकरणी आरोपी तरूणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र टीसींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफलाइन (mumbai local) . दररोज लाखो प्रवासी कामानिमित्त या लोकलने प्रवास करत असतात. गर्दीच्या वेळेस लोकलमध्ये अनेक भांडणेही होत असतात, पण काही वेळेस ही भांडणं रौद्ररूप धारण करतात आणि एकच गदारोळ माजतो. याच लोकलमध्ये एका तरूणाला मारहाण झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. ती अद्याप ताजी असतानाच सोमवारी एका तरूणीने लोकलमधील टीसीवर (girl beat up TC) हात उचलत तिला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट-गोरेगाव लोकल प्रवासादरम्यान ही घटना घडली. एका तरूणीने टीसीच्या कॉलरला हात लावला आणि तिला मारहाणही केली. टीसीने तिकीटाची विचारणा केल्यानंतर संतप्त तरूणीने हे कृत्य केल्याचे समोर आले असून त्यामुळे सर्वच प्रवासी हादरले. याप्रकरणी आरोपी तरूणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र या घटनेमुळे टीसींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास चर्चगेट येथून गोरेगावच्या दिशेने निघालेल्या लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात एक तरूणी चढली. दादर स्थानक येताच दोन महिला टीसी या डब्यात चढल्या आणि त्यांनी प्रवाशांचे तिकीट, पास तपासण्यास सुरूवात केली. मात्र सदर तरूणीकडे फर्स्ट क्लासचे तिकीट नव्हते, त्यामुळे एका टीसीने तिला दंड भरण्यास सांगितले. तेव्हा आरोपी तरूणीने दंड भरण्यास नकार देत त्या टीसीसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. हा वाद वाढला आणि संतप्त तरूणीने त्या टीसीची कॉलरच पकडली तसेच तिला मारहाण आणि धक्काबुक्कीही केली.
ही तरूणी हिंसक झाल्याने आजूबाजूच्या महिला प्रवाशांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच एकीने चेन खेचून लोकलही थांबवली. त्यानंतर काही काळ माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान ही लोकल खोळंबली होती. लोकल वांद्रे रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर आरोपी तरुणीला टीसीने उतरवून लोहमार्ग पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.