Mumbai Crime : राजस्थानहून मुंबई गाठली, पाणीपुरीही विकली; बुलेटच्या लोभाने सगळं केलं, पण…
मुंबईत आलेल्या तिघांचं एकच उद्दिष्ट होतं ते म्हणजे रॉयल एनफिल्ड बुलेट बाईक्स... शहरात राहण्यासाठी त्यांनी पाणीपुरी विकली, स्वयंपाकी म्हणूनही काम केलं. पण त्यांची एक कृती त्यांना थेट अशा ठिकाणी घेऊन गेली, ज्याच्या त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता.
मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : मुंबई … स्वप्नांची नगरी !अनेक जण इथे त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी येतात, त्यासाठी ढोर मेहनतही करतात. मेहनत करनेवालों की कभी हार नही होती, त्याचप्रमाणे जे कष्ट उपसतात त्यांना मुंबई कधीच निराश करत नाही असं म्हणतात. पण ज्यांना मेहनत नको, आणि आडमार्गाने यश मिळवायचंय, त्यांना कधी ना कधी फटका बसतो. केलेल्या सगळ्या बऱ्या-वाईट कामांचा हिशोब इथेच द्यावा लागतो ना. असंच काहीसं त्या तिघांसोबतही घडलं, त्यांच्या कर्माची शिक्षा (crime news) त्यांना इथेच मिळाली.
राजस्थानहून मुंबईत आलेले ते तिघे मित्र.. इतरांप्रमाणेच मुंबईत आले असं बाकीच्यांना वाटलं. पण त्यांच उद्दिष्ट काही वेगळंच होतं. त्यांना दिसत होत्या रॉयल एनफिल्ड बुलेट्स. त्या चोरण्याच्या हेतूनेच त्यांनी राजस्थानमधलं चित्तोरगढ सोडलं आणि मुंबई गाठली. दोन बाईक्स चोरून ते गावी घेऊन गेलेही, मात्र तिसरी बाईक लांबवण्यापूर्वीच त्यांचं नशीब फिरलं आणि हातात पडल्या पोलिसांच्या बेड्या (arrested by police) . बाईक्स चोरणाऱ्या त्या तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या दोन बाईक्सही जप्त करण्यात आल्या आहेत. हे तिघेही आरोपी गेल्या महिनाभरापासून मुंबई आणि पुण्यात राहून पाणीपुरी विकून उदरनिर्वाह करत होते आणि स्वयंपाकी म्हणून काम करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
रमेश मेनारिया (वय 31), हिम्मत गुजर (वय 32), आणि हिरालाल अहीर (वय 24) या तिघांचा एकच उद्देश होता, ते म्हणजे कसंही करून बुलेट्स मिळवणं. बराच काळ प्रयत्न करूनही अपयशच हाती लागलं. मात्र काही दिवसांनी त्यांनी मरीन ड्राइव्ह आणि अंधेरीमधून दोन बाईक्स चोरल्याच.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “ऑगस्टमध्ये ते मुंबईत आले आणि त्यांनी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ लॉक तोडून बुलेट चोरली. त्यापैकी दोघांनी गाडी त्यांच्या गावी परत नेली. मुंबईत रहात असताना त्यांनी प्रसंगी पाणीपुरीदेखील विकली. एका बाईकची चोरी यशस्वी झाल्यावर आणखी दोन बाईक मिळवण्याच्या इच्छेने ते (आरोपी) सप्टेंबरमध्ये मुंबईला परतले. मरीन ड्राईव्हवरून त्यांनी दुसरी बाईक चोरली आणि ती घेऊनही ते गावी गेले. ”
दोन बाईक्स चोरी झाल्याच्या तक्रारी मिळाल्यनंतर अंधेरी पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी रेल्वे स्टेशन्स, तसेच विविध ठिकाणचे 250 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजही चेक केले. वरिष्ठ निरीक्षक संताजी घोरपडे यांनी आरोपींना पकडण्यासाठी एपीआय शशिकांत भोसले, पीआय दहिफळे, पीएसआय किशोर परकाळे आणि कॉन्स्टेबल पेडणेकर, सूर्यवंशी, सोनजे, जाधव, लोंढे, कापसे, मोरे आणि पिसाळ यांचा समावेश असलेले एक पथक तयार केले.
अशी केली अटक
अखेर पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून महत्वाची माहिती मिळाली. या तिघा आरोपींपैकी एक असलेला रमेश मेनारिया याच्या ठिकाणाची पोलिसांना माहिती मिळाली. तो ताडदेव परिसरात असल्याचे समजताच, पोलिसांनी सापळा रचून मेनारियाला अटक केली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याच्या इतर दोन साथीदारांपर्यंत पोहोणे फारसे कठीण नव्हते. गुज्जर आणि अहीर या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली.
“ तिघेही आरोपी राजस्थानचे रहिवासी आहेत. रॉयल एनफिल्ड बुलेटच्या वेडामुळे ते मुंबईत आले आणि येथूनच त्यांनी वाहनं चोरून राजस्थानला नेली, अशी कबुलीही आरोपींनी दिली. आम्ही त्यांच्या घरातून चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत,” असे अंधेरी पोलिस स्टेशनचे पीएसआय किशोर परकाळे यांनी सांगितलं.