Mumbai Crime : आधी त्याला दारू पाजली, मग दगडाने डोकं ठेचून संपवलं… कांदिवलीतील त्या मृतदेहाचं रहस्य अखेर उलगडलं
कांदिवलीमध्ये एका इसमाचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली होती. अखरे त्या हत्येचा उलगडा करण्यात समता नगर पोलिसांना यश आले असून याप्रकरणी 34 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे
मुंबई | 4 डिसेंबर 2023 : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढलं आहे. त्यातच मुंबईचे पश्चिम उपनगर असलेल्या कांदिवलीमध्ये एका इसमाचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली होती. अखरे त्या हत्येचा उलगडा करण्यात समता नगर पोलिसांना यश आले असून याप्रकरणी 34 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमसंबंधामध्ये अडसर ठरत असल्यानेच आरोपीची त्या इसमाला दारू पाजून त्याची हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.
कांदिवली पूर्वेला असलेल्या दामू नगर परिसरात निर्जनस्थळी काही दिवसांपूर्वी एका इसमाचा मृतदेह सापडला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी समता नगर पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आल्यावर पोलिसांनी तपास करून अपमृत्यूची नोंद केली होती. स्थानिक रहिवाशांकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर मृताचे नाव योगेश कांबळे असल्याचे पोलिसांना समजले. त्याच्या डोक्याला बराच मार लागला होता, पण घटनास्थळी अशी कोणतीच वस्तू सापडली नाही. पोलिसांनी स्थानिक खबऱ्यांच्या मार्फत माहिती घेतली काढली असता, ज्याचा मृत्यू तो योगेश हा तो रविंद्र गिरी या इसमासोबत बसून दारू प्यायल्याचे त्यांना समजले.
आरोपीने दिली खुनाची कबुली
त्यानंतर पोलिसांनी गिरी याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्यानेच हत्या केल्याचे निष्पन्न झाले. गिरी याचे मृत कांबळे याच्या पत्नीशी प्रेमसंबध होते. मात्र योगेश त्यांच्या प्रेमात अडथळा ठरत होता. त्यामुळेच गिरी हा योगेश सोबत बसून दारू प्यायला आणि त्यानंतर तो योगेशला खाण परिसरात घेऊन गेला. तेथे त्याने संधी साधून योगेशच्या डोक्यावर दगड मारून त्याची हत्या केली.तपास करणाऱ्यांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने कांबळेचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवण्यासाठी आरोपी गिरी याने खुनाचे हत्यार, एक दगड त्याच्या बॅगेत लपवून ठेवला.
आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई
या हत्येप्रकरणी समता नगर पोलिसांनी रवींद्र गिरी याला तात्काळ अटक केली. याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.