Mumbai Crime : पुढच्या महिन्यात चौघे फुटबॉल मॅच खेळायला जाणार होते, पण त्या आधीच अघटित घडलं…
वायएमसीए मैदानावर फूटबॉलची प्रॅक्टीस करून चौघेही पायी जात होते. स्टेशनवरून घरी जाण्यासाठी ट्रेन पकडणार तेवढ्याच समोरून वेगाने कार आली आणि नको ते घडलं. चौघांपैकी तिघे जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई | 4 ऑक्टोबर 2023 : सीएसटी जंक्शनजवळ असलेल्या मॅकडोनाल्डसमोर एका वृद्ध व्यक्तीच्या कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात चौघे जखमी (4 injured) झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असून चौथ्या मुलाला किरकोळ दुखापत झाली आहे. मंगळवारी रात्री हा अपघात (car accident) झाला. ही चारही मुलं फूटबॉल खेळण्यासाठी आली होती.
आझाद मैदान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप चटवानी नावाच्या 80 वर्षांच्या वृद्ध गृहस्थांच्या टाटा टिआगो कारची धडक बसून हा अपघात झाला. ते मूळचे माहिम येथील रहिवासी आहेत. त्यांच्या कारमधून ते जीपीओच्या दिशेने येत होते आणि सिग्नलवरून उजवीकडे वळताना त्यांच्या कारची एका खासगी बसशी हलकी टक्क झाली.
असा घडला अपघात
त्यानंतर चटवानी यांनी तिथून पटकन निघून जाण्याच्या उद्देशाने कारचा स्पीड वाढवला पण त्यांना कारवर ताबा ठेवता आला नाही. मॅकडोनाल्डसमोर पोलिसांची एक व्हॅन उभी होती. तेथून चौघे जण पायी चालत जात होते. चटवानी यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती भरधाव वेगाने पुढे गेली आणि त्या चौघा जणांना धडकून पुढे गेली आणि पोलिस व्हॅनशी (कारची) टक्कर झाली. या अपघातात सद्दाम अन्सारी (18), प्रवीण गुप्ता (18) आणि अजय गुप्ता (18) हे तिघे गंभीर जखमी झाले. तर विजय राजभर (17) याला किरकोळ दुखापत झाली.
त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्दाम अन्सारी आणि प्रवीण गुप्ता हे दोघेही आयसीयूमध्ये आहेत. तर अजय गुप्ता याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. हे सर्वजण सेवरी भागाती रहिवासी आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
ड्रायव्हरला करण्यात आली अटक
हा अपघात मंगळवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास घडली. दिलीप चटवानी यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे, असे डीसीपी प्रवीण मुंढे यांनी सांगितले. चटवानी जी टिगो कार चालवत होते ती ऑटोमॅटिक होती आणि कारला अपघात झाला तेव्हा कारमधील एअर बॅग उघडली त्यामुळे त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही, असे पोलिसांनी नमूद केले.
अपघातामध्ये जखमी झालेली चारही मुले फुटबॉलपटू आहेत आणि GIFA स्पोर्ट्स क्लबकडून फुटबॉल खेळतात. कुलाब्याच्या वायएमसीए मैदानावर ते सरावासाठी आले होते. तेथून सीएसएटी स्टेशनवर जाऊन ते घरी जाण्यासाठी ट्रेन पकडणार होते. पुढील महिन्यात चौघंही फुटबॉलचा सामना खेळण्यासाठी बेळगावला जाणार होते, असे क्लबचे प्रशिक्षक हरीश गोलार यांनी सांगितले
या अपघाताप्रकरणी आझाद मैदान पोलीसांनी आयपीसी कलम 279,338 आणि मोटार वाहन कायद्यानुसार एफआयआर नोंदवली आहे. अधिक तपास करण्यात येत आहे.