Mumbai Crime : चेन चोरून पब्लिक टॉयलेटमध्ये घुसला, पण तिथून गायबच झाला.. सराईत चोराने कसा दिला गुंगारा ?
मास्क घालून आलेल्या चोराने महिलेच्याच गळ्यातील लाखोंची चेन हिसकावत पळ काढला. मात्र त्यानंतर तो गायबच झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो कुठेच दिसला नाही, त्यामुळे पोलिसही चक्रावले.

मुंबई | 26 ऑक्टोबर 2023 : एखादा चोर किंवा गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कधी ना कधी सापडतोच. मात्र काहीवेळा गुन्हेगार असं डोकं लढवतात, की त्यामुळे थोड्या वेळासाठी पोलिसही चक्रावू शकतात. गुन्हा करून सराईतपणे ते गुंगारा देतात. अशीच एक घटना मुंबईतही (crime in mumbai) घडली. त्यामध्ये एका चेन स्नॅचरने त्याच्याच सहकारी महिलेची चेन पळवली आणि तो तेथून पब्लिक टॉयलेटमध्ये गेला आणि गायबच झाला. तिथून त्याचा काही मागच लागला नाही, सीसीटीव्हीमध्ये देखील तो दिसला नाही.
चेन स्नॅचिंगची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले मात्र त्या चोराचा कुठेच पत्ता लागला नाही, जणू तो हवेच गायबच झाला असावा. त्याचा कारमाना पाहून पोलिसही थक्क झाले. चोरी करून गायब झालेल्या त्या साईत चोराने असा गुंगारा दिला, ज्याचा कोणी विचारही करू शकणार नाही. मात्र अखेर त्याच्या या कृतीमागचे रहस्य उलगडले आणि पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळण्यात यश मिळाले. चोरीनंतरची गायब होण्याची त्याची क्लुप्ती पाहून पोलिसही काही वेळासाठी चक्रावले हेच खरं.
कसा दिला पोलिसांना गुंगारा ?
मिळालेल्या माहितीनुसार, आबासाहेब कमळकर ( वय २८) असे आरोपीचे नाव आहे. तो बीएमसीच्या कंत्राटी रुग्णालयात सफाई कामगार म्हणून काम करतो. १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ च्या सुमारास फिर्यादी महिला रुग्णालायतील काम संपवून निघाली. एलबीएस रोडवरील माटुंगा बाजार भागात ती महिला पोहोचल्यानंतर तोंडावर मास्क लावून आरोपी कमलाकर अचानक कुठून तरी आला आणि त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून तो फरार झाला. याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक दीपक चव्हाण यांनी पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले. त्यांनी घटनास्थळाजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली
पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, चेन खेचून नेणाऱ्या इसमाने लाल रंगाचा टी-शर्ट घातला होता. सीसीटीव्हीचे फुटेज चेक करत असताना आम्हाला त्या वर्णानाचा माणूस तर दिसला, पण त्याने काहीच फायदा झाला नाही. कारण तो (संशयित) पब्लिक टॉयलेटमध्ये ( सार्वजनिक स्वच्छतागृह) आत गेला, पण अनेक तास उलटून गेल्यानंतरही तो काही बाहेर आलेला दिसला नाही. जणू काही तो कुठेतरी गायबच झाला, असे पोलिसांनी सांगितले. मात्र त्यानंतर पोलिसांनी तेच सीसीटीव्ही फुटेज, पुन्हापुन्हा अनेकवेळा पाहिल्यानंतर त्यांना चोराची क्लुप्ती समजली. तो (संशयित) सार्वजनि स्वच्छतागृहाच्या बाहेर तर आला, पण जरा वेगळ्याच अवतारात, असे पोलिस म्हणाले.
गुन्ह्यानंतर आरोपी कमलाकरने त्याचा लाल टी-शर्ट फेकून दिला आणि वेगळेच कपडे परिधान केले. “ आतमध्ये जाताना त्याच्याकडे बॅग किंवा काहीही नव्हते, त्यामुळे त्याने कपडे बदलले असावेत असा संशय आम्हाला आला नाही. पण नंतर आमच्या लक्षात आले की हा सर्व पूर्वनियोजित प्लान होता. त्याने आधीच माटुंगा आणि चिंचपोकळी येथील सार्वजनिक शौचालयात कपड्यांचा एक सेट ठेवला होता,” असे पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
दोनदा बदलले कपडे
विशेष म्हणजे आरोपीने दोन वेळा कपडे बदलले आणि नंतर माटुंगा येथील कामाच्या ठिकाणी गेला. “ आपण गावी, सांगलीला जात असल्याचे सांगून त्याने रजेसाठी अर्ज केला. मात्र हे चोरीच्या घटनेच्या चार दिवसांनंतर पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराचा पत्ता मिळवला आणि त्याला शोधण्यासाठी एक टीम तेथे पाठवण्यात आली. चोरी केलेली सोन्याची चेन आरोपी कमलाकर याने त्याच्याच इमारतीतील एका व्यक्तीला विकून त्याचे पैसे घेतले, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
अखेर पोलिसांच्या पथकाने त्याला सांगलीतून अटक करून मुंबईत परत आणले. तसेच चोरी केलेली सोन्याची चेनही जप्त करण्यात आली. आरोपीला सध्या न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली.
पुण्यातही घडला होता असा प्रकार
दरम्यान यापूर्वी पुण्यातही अशीच घटना घडली होती. पुणे शहर पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिटने एका अतिहुश्शार चोराला अखेर जेरबंद केले. बाईक्स चोरल्याप्रकरणी हडपसर येथून त्याला अटक करण्यात आली. बाईक चोरीसाठी त्याने जी शक्कल लढवली होती, ती समजल्यावर सर्वच थक्क झाले. बाईक्स चोरायला जाताना तो आरोपी हा एकावर एक असे ८ ते १० शर्ट चढवून किंवा घालून जायचा. एकदा का बाईक चोरून धूम ठोकली की दर थोड्या-थोड्या अंतराने तो अंगातील शर्ट बदलायचा. बाईक चोरीनंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालोच तरी कोणीही आपल्याला ओळखू नये म्हणून त्याने ही शक्कल लढवली. बाईक चोरून फरार झाल्यावर थोड्या-थोड्या अंतरावर तो अंगातील एकेक शर्ट काढून टाकायचा. त्यामुळे त्याच्या शरीरावर नेहमी नवा शर्ट दिसायचा आणि कोणी त्याला ओळखू शकायचे नाही, पकडण्याचा प्रश्न तर दूरच राहिला. पोलिसांनी बराच शोध घेऊन त्याला अटक केली.