ईस्टर्न एक्प्रेस हायवेवरील नालंदा पूल ठरतोय मृत्यूचा सापळा, दोन तासात दोघांनी गमावले प्राण, काय घडलं नेमकं?
रविवारची सकाळ दोन धक्कादायक घटनांनी उगवली. नालंदा पुलावर पहाटे जे घडले त्याने दोन कुटुंब शोकसागरात बुडाले.
मुंबई : घाटकोपर पूर्वेकडील इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील नालंदा पुलावर रविवारी पहाटे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. चिन्मय शिंदे आणि प्रदीप डगारे अशी अपघातात मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत. वाहनांना ओव्हरटेक करताना तोल गेल्याने दोन तासात दोन तरुणांना जीव गमवावा लागला. तर मोहिनुद्दीन कुरेशी हा तरुण जखमी झाला. तर दुसऱ्या घटनेत फुटपाथवर झोपलेल्या तरुणाला डंपरने चिरडल्याची घटना घडली. पहिला अपघात सकाळी पावणे पाचच्या सुमारास झाला, तर दुसरा अपघात सव्वा सहाच्या सुमारास घडला.
ओव्हरटेक करताना पहिला अपघात
पहाटे 4.40 ते 4.55 च्या दरम्यान चिन्मय शिंदे हा मोटारसायकलस्वार मुंबईहून ठाण्याकडे चालला होता. चिन्मय हा वेगात आणि बेदरकारपणे गाडी चालवताना दुसऱ्या मोटारसायकलवर आदळला आणि रस्त्याच्या कडेला घसरून गंभीर जखमी झाला. दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात याचा तोल गेला. चिन्मयला तात्काळ राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चिन्मयविरुद्ध बेदरकारपणे वाहन चालवणे, निष्काळजीपणामुळे मृत्यू होणे इत्यादी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत फुटपाथवर झोपलेल्या तरुणाला डंपरने चिरडले
पहिल्या अपघातानंतर अवघ्या तासाभरात दुसरी घटना घडली. सकाळी 6.15 च्या सुमारास, बीएमसीच्या क्लीन-अप ट्रकचा चालक संदिप डगारे आपल्या ड्युटीवर जात असताना त्याला नालंदा बसस्थानकावर नालंदा पुलाजवळ गर्दी आणि पोलीस दिसले. त्याने गर्दी का जमली म्हणून पाहिले असता एका तरुणाचा अपघात झाला होता. तो तरुण दुसरा तिसरा कुणी नसून त्याचाच भाऊ होता.
प्रदिप हा त्याचा भाऊ संदिपसोबत राहत होता. प्रदीप कधी कधी कामावरुन रात्री उशिरा घरी येत असे. यामुळे भावाला डिस्टर्ब नको म्हणून तो कधी-कधी बाहेर किंवा फूटपाथवर उभ्या असलेल्या ऑटोरिक्षामध्ये झोपायचा. रविवारीही प्रदिपने असेच केले. तो फूटपाथवर झोपला होता तेव्हा एका डंपरने त्याला चिरडले, असे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर डंपर चालकाने तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. डंपरच्या चालकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 304 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.