शरद मोहोळ प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, अवघ्या आठ तासात मुख्य आरोपी ताब्यात
Sharad Mohol Case : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा गेम वाजवणाऱ्या मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. शरद मोहोळ याची जमीनीच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समजत होती. पोलिसांनी मुख्य आरोपीसह इतर सात जणांना ताब्यात घेतलं आहे.
पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या घालून हत्या केली आहे. शरद मोहोळ याच्या हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरली. गोळीबारानंतर पुणे पोलिसांनी तीन पथक रवाना केलेलीत. पुणे पोलिसांनी आपली सर्व सूत्र हलवली आणि अवघ्या आठ तासांच्या आतमध्ये मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याच्यासह सात साथीदारांना ताब्यात घेतलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेन ही कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपींना शिवापूर टोल नाक्याच्या पुढे किकवी ते शिरवळ दरम्यान अटक केली.
असा केला शरद मोहोळचा गेम
शरद मोहोळ दुपारी एक वाजता घराबाहेर पडला होता. त्यावेळी आरोपी त्याच्यासोबतच होते. शरद मोहोळ पुढे चालत असताना मुन्ना पोळेकर याने चार गोळ्या मारल्या होत्या. यामधील एक पायाला आणि दोन पाठीला लागल्या. जेव्हा शरद मोहोळ हल्ला कोणी केला हे पाहायला मागे फिरला त्यावेळी त्याच्या छातीत चौथी गोळी मारली. गोळ्यांच्या आवाजाने बाजूचे सर्वजण बाहेर आले तेव्हा शरद मोहोळ जखमी अवस्थेत पडला होता आणि आरोपी पसार झाले होते. घटनास्थळी मोहोळ याची चप्पल आढळून आली.
गुन्ह्याचा तपास करताना पुणे शहर गुन्हे शाखेची तपास पथके पुणे शहर परिसर, पुणे ग्रामीण, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली होती. पुणे सातारा रोडवर किकवी ते शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करत पोलिसांनी 8 आरोपींना ताब्यात घेतलं. यावेळी त्यांच्याकडून 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राउंड आणि दोन चार चाकी गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
शरद मोहोळ याची हत्या जमिनीच्या पैशाच्या जुन्या वादातुन केली असल्याचं प्रथम दर्शी तपासात निष्पन्न झालं आहे. सदरची कामगिरी पुणे शहर गुन्हे शाखेने कारवाई करून घटनास्थळी गोळीबार करणाऱ्या आणि त्यांना मदत करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे.
दरम्यान, शरद मोहोळ याच्या खूनाच्या बातमीमुळे पुण्यात परत एकदा टोळी युद्ध पेटलं असं सर्वांना वाटलं होतं. कारण पुण्यातील मारणे आणी मोहोळ टोळीची बऱ्याच वर्षांपासूनची दुष्मनी आहे. याआधी अनेकजणांचे या टोळीयुद्धामध्ये बळी गेलेत. मात्र आता आरोपी मुन्ना याने कोणत्या जमीनीच्या वादातून मोहोळला संपवलं याबाबत लवकरच खुलासा होईल.