Crime : तिचं 2 महिन्यापूर्वी लग्न झालं, ती माहेरी आली, त्याने अखेर 2 जीव संपवले
मनापासून प्रेम केलेल्या जोडीदाराला तिच्या लग्नानंतर विसरून जावं लागतं. परंतु काही प्रेमवीरांना सहन होत नाही. अशाच प्रकारचं साताऱ्यातून एक प्रकरण समोर आलंय.
सातारा : प्रेम आंधळं असतं असं बोललं जातं, कारण प्रेयसी आणि प्रियकर दोघेही एकमेकांसाठी कोणताही निर्णय घेतात. मात्र अनेकवेळा घरी सांगता येत नसल्याने काहींची प्रेम कहानी अधुरी राहते. मनापासून प्रेम केलेला जोडीदार डोळ्यादेखत दुसऱ्या कोणाचा होताना पाहावं लागतं. त्यामुळे लग्नानंतर सर्व काही विसरून जावं लागतं. परंतु काही प्रेमवीरांना हे सहनच होत नाही त्यांतर तो किंवा दोघे मिळून जो काही निर्णय घेतात तो सर्वांना थक्क करून टाकणारा असतो. अशातच साताऱ्यातून एक प्रकरण समोर आलं ज्यामुळे माण तालुका हादरून गेला आहे. (Crime News Maharashtra)
नेमकं काय आहे प्रकरण?
सातारा जिल्ह्यामधील माण तालुक्यामधील ही घटना आहे. प्रेमवीराने एका नवविवाहितेला संपवलं आहे. इतकंच नाहीतर त्यानंतर त्याने गळफास घेत आपलंही जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. माण तालुक्यामधील वांझोळी गावामधील ही घटना आहे. नवविवाहित तरूणीचं नाव स्नेहल वैभव माळी असं आहे. तर आत्महत्या करणाऱ्या आरोपीचं नाव दत्तात्रय सुरेश माळी असं आहे.
दत्तात्रय माळी आणि स्नेहल माळीचं एकमेकांवर प्रेम होतं. मात्र स्नेहलच्या घरच्यांनी दोन महिन्यांपूर्वी तिचा विवाह लावून दिला होता. लग्नानंतर स्नेहल आपल्या माहेरी म्हणजेच वांझोळीत आली होती. दोघांचेही घर अगदी जवळच होते, दत्तात्रयने संध्याकाळच्या सुमारास स्नेहलला आपल्या घरी बोलावून घेतलं. जेव्हा स्नेहल आली त्यावेळी त्याच्या घरात कोणी नव्हतं, आरोपी दत्ताने याचाच फायदा घेत तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. स्नेहल रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा जाग्यावरच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी दत्तात्रयने स्नेहला संपवलं त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, या घटनेची माहिती औंध आणि पुसेसावळी पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह एकाच घरात आढळून आले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवले. या घटनेची नोंद रात्री उशिरा औंध पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.