Nagpur Child Death : ऐन सणाच्या दिवशी शोककळा, नायलॉन मांज्याने गळा कापल्याने बालकाचा मृत्यू
जरीपटका परिसरातील महात्मा गांधी शाळेत पीडित मुलगा पाचवी इयत्तेत शिकत होता. शनिवारी शाळा सुटल्यानंतर पीडित मुलगा वडिलांसोबत घरी चालला होता.
नागपूर : मकरसंक्रातीचा सण राज्यभर उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र उत्साहाला गालबोट लावणारी घटना नागपुरात उघडकीस आली आहे. वडिलांसोबत दुचाकीवरुन जात असताना शनिवारी सायंकाळी 11 वर्षाच्या मुलाचा नायलॉन मांजाने गळा कापला. त्याला तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने अतिरक्तस्त्राव झाल्याने मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शाळा सुटल्यानंतर वडिलांसोबत घरी चालला होता
जरीपटका परिसरातील महात्मा गांधी शाळेत पीडित मुलगा पाचवी इयत्तेत शिकत होता. शनिवारी शाळा सुटल्यानंतर पीडित मुलगा वडिलांसोबत घरी चालला होता. मात्र वडिलांसोबतचा त्याचा हा प्रवास अखेरचा ठरला आहे.
नायलॉन मांजाने गळा कापला
वडिलांसोबत दुचाकीवरुन जात असतानाच परिसरातील मुले पतंग उडवत होती. पतंगाचा नायलॉन मांजा मुलाच्या गळ्यात अडकला आणि गळा कापला गेला. यात मुलाच्या गळ्यावर गंभीर जखमी झाल्याने मोठा रक्तस्त्राव होऊ लागला.
उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू
मुलाला तात्काळ मानकापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला धंतोली येथील रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरु केले. मात्र डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि रविवारी सकाळी मुलाचा मृत्यू झाला.
मुलाच्या अचानक अशा जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ऐन संक्रातीत जरीपटका परिसरावर शोककळा पसरली. दोन दिवसांपूर्वी पतंग पकडण्याच्या नादात रेल्वेच्या धडकेत 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.