Nagpur Crime : घरातील मंडळी बाहेरगावी गेली होती, मुलीला खिडकीत पाहून शेजाऱ्यांनी विचारपूस केली तर…
बंद घराच्या खिडकीतून एक मुलगी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. शेजाऱ्यांचं मुलीकडे लक्ष गेल्यानंतर त्यांनी तिची चौकशी केली. चौकशीनंतर शेजाऱ्यांना धक्काच बसला.
नागपूर / 31 ऑगस्ट 2023 : नागपुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका घरात कोंडून ठेवण्यात आलेल्या 8 ते 10 वर्षीय मुलीची शेजाऱ्यांच्या मदतीने सुटका करण्यात आली आहे. मुलीला विकत घेऊन घरकामासाठी नागपुरात आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील बेसा-पिपळा रोडवरील ‘अथर्व नगरी’ या उच्चभ्रू वस्तीत ही घटना घडली आहे. या घटनेमुळे नागपुरात एकच खळबळ माजली आहे. मुलीला हुडकेश्वर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
लाईट गेल्याने मुलगी बाहेर आली आणि उलगडा झाला
गेल्या 5 ते 6 दिवसांपासून मुलीला घरात एकटे कोंडून कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. खिडकीच्या ग्रीलमधून मुलगी बाहेर पडल्यावर शेजाऱ्यांनी विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली. मुलीला पोलिसांच्या स्वाधीन केले असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. ज्या परिवाराकडे ही मुलगी राहायची तो परिवार या सोसायटीत भाड्याने राहायचा.
मुलीकडून घरकाम करुन घेतले जात होते
उच्चभ्रू वस्ती असल्याने इथे कोणीही कोणाच्या घरी काय चाललंय पाहत नाही. मात्र जेव्हा त्या घराची लाईट कापण्यात आली आणि अंधारात मुलगी घाबरली, तेव्हा ती खिडकीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना शेजाऱ्यांना दिसली. त्यामुळे सोसायटीतील नागरिक आणि सामाजिक संस्थेच्या लोकांनी तिला तिथून बाहेर काढलं आणि पोलिसांकडे सुपूर्द केलं. सोसायटीत नागरिकांना मुलीने सांगितलं की, तिच्याकडून घरातील सगळी काम करवून घेतली जात होती. त्याचप्रमाणे तिला चटके दिले जात होते, असे सोसायटीच्या सेक्रेटरी यांनी सांगितलं.