अकोला पोलिसांची अमरावतीत सिनेस्टाईल कामगिरी! कारच्या टायरवर गोळी झाडत पळ काढणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या
Amravati Crime News : अकोला येथील कुख्यात आरोपी राजेश सुभाष राऊत हा अकोला येथून पळत अमरावतीत पळून आला होता. त्याचा पाठलाग अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत होते.
अमरावती : आरोपी पळून जात असताना पोलीस आरोपीच्या कारच्या टायरवर निशाणा लावतात. पळून जाणाऱ्या आरोपीचा (Amravati Firing News) कारवरील ताबा सुटतो आणि आरोपीला पोलीस ताब्यात घेतात. असे प्रसंग आतापर्यंत तुम्ही फक्त सिनेमात पाहिले असतील. पण अशीच सिनेस्टाईल थरारक कारवाई अमरावतीत (Akola Police in Amravati) घडली. अमरावतीमध्ये आरोपीच्या मुक्या आवळण्यासाठी दाखल झालेल्या अकोला पोलिसांच्या हातावरुन तुरी देऊन आरोपी पसार होण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी आरोपीने पोलिसांवर रिवॉल्व्हरहू रोखून धरली होती. पण अकोला पोलिसांनी धाडसी कारवाई करत पळून जाणाऱ्या वॉन्टेड (Most Wanted Accused Rajesh Subhash Raut) आरोपीच्या कारच्या चाकावर निशाणा लावला. टायरवर पोलिसांनी गोळी झाडली आणि यामुळे कारवरील नियंत्रण सुटल्यानं गाडी एका पोलवर आदळली. अखेर पोलिसांनी गाडीतून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला स्थानिक पोलीस स्थानकात आणलं. ही थरारक घटना घडली अमरावतीमधील लक्ष्मीनगरमध्ये. आरोपीला पोलिसांनी आता स्थानिक पोलीस स्थानकात आणलं असून त्याची कसून चौकशी केली जातेय.
नेमका कोणंय आरोपी?
अकोला येथील कुख्यात आरोपी राजेश सुभाष राऊत हा अकोला येथून पळत अमरावतीत पळून आला होता. त्याचा पाठलाग अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत होते. दरम्यान अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लक्ष्मीनगरात आरोपीला पकडत असताना त्याने थेट पोलिसांवरच रिव्हॉल्व्हर रोखली.
आरोपीला पकडण्यासाठी सापळा
यानंतर आरोपी राजेश पळून जात होता. दरम्यान पोलिसांनी आरोपीच्या गाडीच्या टायरवर गोळीबार केला. त्यामुळे आरोपीची चारचाकी अनियंत्रित झाली व गाडी थेट एका पोलला धडकली. त्यामुळे पोलिसांनी लागलीच आरोपीला ताब्यात घेऊन गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये आणले. आरोपी राजेश हा अमरावतीत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. गोपनीय माहितीच्या आधारे अकोला पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला होता.
पुढील तपास सुरु
आरोपी राजेश सुभाष राऊत मूळचा गजानन नगर, जुना अकोला, येथील रहिवासी आहे. या आरोपीचा पाठलाग अकोला गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी गेले अनेक दिवस करत होते. बुलडाण्यापासून आरोपीचा पाठलाग करत अकोला पोलीस अमरावतीच्या लक्ष्मी नगर पर्यंत येऊन पोहोचले. अखेर अकोला गुन्हा शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपी राऊतला पकडण्यात यशस्वी झाले. पुढील तपास अकोला पोलीस करत आहेत. तसंच गोळीबार अमरावती गाडगे नगर हद्दीमध्ये झाल्यामुळे गाडगे नगर पोलीस घटनेचा पूर्ण तपास करीत आहे. आरोपीवर अकोल्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.