Accident : अपघातांची मालिका थांबेना! अमरावती-नागपूर महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स पलटली, 2 प्रवासी ठार
Amravati Accident : सलग दुसऱ्या दिवशी बस अपघात झाल्याची घटना राज्यात घडली आहे. सोमवारी औरंगाबादच्या किन्हळ फाट्याजवळ एपसटी बसचा अपघात झाला होता.
अमरावती : रविवारीपासून सुरु असलेलं अपघात सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. सोमवारी रात्री पुन्हा एक भीषण अपघात (Amravati Accident News) झाला. या अपघातात दोघा प्रवाशांचा जीव गेलाय. तर काही जण जखमी झाते. अमरावती नागपूर महामार्गावर एका खासगी ट्रॅव्हल्स (Private Bus Overturns) पलटी झाली. नांदगावपेठ जवळ खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. नागपूरहून ही खासगी ट्रॅव्हल्स बुलडाण्याला (Nagpur to Buldana Private Bus Accident News) जात होता. त्यावेळी या खासगी बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांमध्ये पंजाब आणि नागपूरमधील व्यक्तींचा समावेश आहे. बसचा हा अपघात नेमका कशामुळे झाला हे कळू शकलेलं नाही. दरम्यान, चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव बस पलटी झाली असावी शंका व्यक्त केली जाते आहे. या अपघातानंतर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त बस बाजूला हटवण्यात आली. मध्यरात्री घडलेल्या या अपघातानंतर प्रवाशांचा एकचा गोंधळ उडाला होता.
सलग दुसऱ्या दिवशी बस अपघात
सलग दुसऱ्या दिवशी बस अपघात झाल्याची घटना राज्यात घडली आहे. सोमवारी औरंगाबादच्या किन्हळ फाट्याजवळ एपसटी बसचा अपघात झाला होता. कसाबखेड्याला जाणारी एसटी पलटली होती. या बसमध्ये सुमारे 40 प्रवासी प्रवास करत होते. थोडक्यात या अपघातातून सर्व प्रवासी अगदी बालंबाल बचावले होते. दुसरीकडे गेल्या आठवड्यात लासूर स्टेशनहून गवळी शिवारला जाणारी बस खड्ड्यात आदळली होती. यामुळे भरधाव गाडीचे टायर पडले होते. त्यामुळं चालकानं गाडी जागेवर थांबवून अपघात टाळला होता. याही वेळी बस पटलली होती. पण, प्रवासी अगदी थोडक्यात बचावले होते.
राज्यात अपघातांची मालिका
राज्यात पावसामुळं ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज बांधून गाडी चालवणं चालकांसाठी जिकरीचं होतंय. सलग तिसऱ्या दिवशी अपघाताची मालिका सुरु असल्याचं पाहायला मिळालंय. रविवारी विनायक मेटे यांच्या गाडीचा मुंबई पुणे एक्स्रेस हायवेवर अपघात झाला होता. त्याच दिवशी बीडमध्ये एका स्विफ्ट आणि आयशर टेम्पोचा अपघात झाला होता. रविवारी झालेल्या या दोन वेगवेगळ्या अपघातात विनायक मेटे यांच्यासह एकूण सात जणांचा मृत्यू झाला होता. तर सोमवारी मध्यरात्री अमरावतीत झालेल्या खासगी बसच्या भीषण अपघातात दोन प्रवाशांना जीव गमवावा लागलाय. त्यामुळे मृत प्रवाशांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर अन्य जखमी प्रवाशांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील अपघातांची मालिका सुरुच असल्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय.