जंगलात खड्डा करुन लपवल्या चोरलेल्या दुचाकी! अमरावती पोलिसांनी शोधल्या कशा?
दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश! काय होती नेमकी दुचाकी चोरांची मोड्स ऑपरेंडी? वाचा सविस्तर
अमरावती : अल्पवयीन मुलांच्या मदतीने दुचाक्या चोरायच्या आणि नंतर त्याच दुचाक्यांचे सुटे भाग भंगारात विकून पैसा लाटायचे, असा प्रकार एका टोळीकडून केला जात होता. अमरावतीच्या परतवाडा पोलिसांनी या टोळीच्या अखेर मुसक्या आवळल्यात. धक्कादायक बाब म्हणजे चोऱ्या केलेल्या दुचाक्या एका जंगलात खड्डा खणून त्यात लपवण्यात आल्या होत्या. खड्ड्यात पुरलेल्या दुचाकीही आता पोलिसांनी हस्तगत केल्या. तब्बल 3 लाख 15 हजार रुपयांचं मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली असून दोघे जण फरार आहे. पोलिसांकडून फरार चोरांचाही शोध घेतला जातो आहे. अटक करण्यात आलेल्यांच्या ताब्यातून तीन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्यात.
दुचाकी चोरांच्या या टोळीत 3 अल्पवयीनांसह एकूण चार जणांचा सहभाग असल्याचं उघड झालं आहे. अंकुश दुरतकर, वय 20, पवन गजानन तनपुरे, वय 19 आणि ज्याच्या भंगाराच्या दुकानात हे सामान विकलं जात होतं, तो भंगार दुकानदार शेख इकबाल शेख युसूफ, वय 43 अशी अटक केलेल्यांची नावं आहेत.
25 नोव्हेंबर रोजी आठवडी बाजारातून एक दुचाकी चोरीला गेली होती. या दुचाकी चोरीचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाला होतं. या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा शोध घेतल दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश केलाय.
एक अल्पवयीन मुलगा पार्क केलेल्या ठिकाणाहून दुचाकी बाजूला घेऊन जायचा. काही अंतरावर उभ्या असलेल्या दोघांच्या ताब्यात त्या दुचाक्या द्यायचा, असं पोलिसांच्या तपासातून समोर आलं होतं.
धक्कादायक बाब म्हणजे चोरी केलेल्या दुचाक्या जंगलात आरोपींनी लपवल्या होत्या. चोरलेल्या दुचाकींवर कुणाचीही नजर पडू नये, यासाठी या टोळीने एक खड्डा खणला. या खड्ड्यात चोरी केलेल्या दुचाकी पुरल्या होत्या. आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हत्तीघाट येथील जंगलात पाहणी केली असता लपवलेल्या दुचाकीही अखेर सापडल्या.
यावेळी दुचाकीचे 3 इंजिन, चार चेसी, सात सायलेन्सर, सहा मडगार्ड, दहा शॉकअपस, सात रिंग, एक पेट्रोल टाकी, एक ब्रेकपॅड आणि दोन बॅटरी असा मुद्देमाल पोलिसांना आढळून आला. चोरलेल्या दुचाकीच्या सुट्या केलेल्या या सर्व सामानाची किंमत 3 लाखापेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातंय.