जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर भिरकावलेला दगड थेट डोक्यावर बसला आणि…
6 जणांवर का करण्यात आला प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा? नेमकं भंडारा जिल्ह्यात काय घडलं?
भंडारा : जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर भंडारा जिल्ह्यात तुफान दगडफेक (Bhandara Stone Pelting) करण्यात आली. या दगडफेकीतील एक दगड थेट एकाच्या डोक्यावर बसला आणि ही व्यक्ती जखमी झाली. या घटनेमुळे घाबरलेल्या चालकाने वाहन थेट कामठी इथं नेलं आणि जखमीस रुग्णालयात दाखल केलं. आता दगडफेकप्रकरणी पोलिसांनी (Bhandara Crime News) गंभीर दखल घेत सहा जणांवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदवलाय. तर दोघांना ताब्यातही घेतलंय. याप्रकरणी अधिक तपास (Bhandara Police) केला जातोय.
नेमका कुठे घडला प्रकार?
भंडारा अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी जनावरांचं वाहन मोहाडी तालुक्यातून जात होते. जांब ते कांद्री मार्गावरुन जात असतेवळी पाच ते सहा जणांनी अचानक वाहनावर दगडफेक करण्यास सुरुवात केली.
या दगडफेकीत मोहम्मद उस्मान यांच्या डोक्याला दगड लागला. सदर प्रकाराने घाबरुन जाऊन चालकाने थेट कामठी गाठलं. जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान, जखमी वाहकाचे साथीदार आंधळगाव ठाण्यात धडकले आणि तिथे तणावाची स्थिती निर्माण झाली.
पोलीस तपास सुरु
सदर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आंधळगाव ठाणे गाठलं. याप्रकरणी रात्रीच सहा जणांवर प्राणघातक हल्लाप्रकरणी भादंवि 307, 34, 143, 145, 149 व महाराष्ट पोलीस अधिनियम 135 कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आलाय.
गुन्हा दाखल असलेल्यांपैकी दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची कसून चौकशी केली जातेय. तर पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय. नेमका हा हल्ला कोणत्या कारणावरुन केला गेला, याचा तपास पोलिसांकडून सुरु असून इतर चार जणांनाही पोलीस ताब्यात घेतात का, हे पाहणं महत्त्वाचंय.