Bhandara Murder : भंडाऱ्यातील श्रद्धा हत्याकांड प्रकरण : चुलत भावाला पोलिसांनी का केली अटक?
8 वर्षांच्या श्रद्धा सिडाम हत्येप्रकरणाचं गूढ लवकरच उलगडणार? पोलीस तपासाला वेग
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील 8 वर्षांच्या श्रद्धा सिडाम या मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली होती. हा व्यक्ती श्रद्धाचा चुलत भाऊ असल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे आता लवकरच श्रद्धाच्या हत्येचं गूढ उकलण्याची शक्यता वर्तवली जातेय. गेल्या सोमवारी श्रद्धा बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढलून आलेला. यामुळे एकच खळबळ उडालेली. श्रद्धाच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून कसून तपास केला जात होता. आता पोलिसांनी 25 वर्षीय अजय पांडुरंग सिडाम याला अटक केली आहे. 9 डिसेंबरपर्यंत अजय सिडाम याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
चुलत भाऊ मुख्य आरोपी?
तणसाच्या ढिगाऱ्यात श्रद्धाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आलेला होता. या हत्याप्रकरणी पोलिसांनी अखेर श्रद्धाचा चुलत भाऊ अजय सिडाम याला अटक केली. साकोली पोलिसांना अजयवर संशय असल्यानं त्यांनी त्याला ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर केलं.
न्यायालयाने अजय याला 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता याप्रकरणी पुढील तपास केला जातो आहे. 8 वर्षांची श्रद्धा सोमवारी बेपत्ता झाली होती. त्यानंतर बुधवारी तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत शेतात आढळून आला होता.
हत्या कोणत्या कारणातून?
श्रद्धा सिडाम या चिमुरडीचा मृत्यू झाला नसून तिची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आलेला. याप्रकरणी अजय सिडाम याला करण्यात आलेली अटक ही हत्याप्रकरणातील पहिलीच अटक आहे. आता अजयच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी या हत्याप्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केलीय. इतरही अनेकांना पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे. सिडाम याची नार्को टेस्ट करण्यासाठीही पोलीस मागणी करणार असल्याचं सांगितलं जातंय.
श्रद्धाची हत्या कोणत्या कारणासाठी केली, हे अद्याप समोर आलेलं नाही. श्रद्धाच्या हत्येचं गूढ उकलण्यासाठी आव्हान भंडारा जिल्ह्यातील साकोली पोलिसांसमोर उभं ठाकलंय.