महाराष्ट्रातील ‘या’ शाळेत विद्यार्थी बेशुद्ध होईपर्यंत मास्तरांनी केली जबर मारहाण
शाळा सुटल्यानंतर स्कूल बसची वाठ पाहणाऱ्याला विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत शिक्षकानं का केली मारहाण? वाचा
भंडारा : शाळा सुटल्यावर स्कूल बसची वाट पाहणाऱ्या एका विद्यार्थ्याला जबर मारहाण करण्यात आली. मारहाण करण्यात आलेला विद्यार्थी नववीत शिकणारा असल्याची माहिती समोर आली आहे. एका शिक्षिकेनं या विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. या संतापजनक घटनेप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात ही घटना घडली. शिक्षकाच्या मारहाणी गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला श्वास घेणं आणि चालणं अवघड झालं असल्याची माहिती समोर आलीय.
तुमसर तालुक्यातील सितासावंगी येथे मॉयलची मँगनिज उत्पादन खाण असून त्यांच्या वतीने मॉयल डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा चालविली जाते. या शाळेत इयत्ता नववीत शिकणारा 15 वर्षीय मयंक हा सोमवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर वर्ग मित्रांसह स्कूल बसच्या प्रतीक्षेत शाळेच्या वऱ्हांड्यात बसला होता.
यावेळी तिथं पोहचलेल्या कोमल मेश्राम नामक शिक्षकाने मयंकला दोन महिन्यापूर्वी दुर्गा उत्सवात काढलेला फोटो आणि शाळेतील वागणुकीबद्दल विचारणा केली. त्यानंतर त्याला जबर मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी 15 वर्षीय मयंकने शिक्षकाची गयावया करून सोडण्याची विनवणी केली. मात्र, शिक्षकाने त्याचा हात मुरगाळत छाती, डोक्यावर आणि पायावर हाताबुक्क्यांनी जबर मारहाण केली.
स्वतःची कशीबशी सुटका मयंकने केली आणि मुख्याध्यापकांकडे पोहचून घडलेली घटना सांगितली. त्यावेळी मयांकला त्यांनी डिसिप्लिन शिक्षकाकडे पाठविले. यावर शाळेतील अन्य शिक्षकांनी मयंकला धीर देत त्यांच्या वडिलांना शाळेत बोलाविले.
आई वडिलांनी शाळेत पोहचत गंभीर अवस्थेत असलेल्या मयंकला तातडीने गोबरवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेवून उपचार केले. याप्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरुन गोबरवाही पोलिसांनी शिक्षक कोमल मेश्राम यांच्या विरुद्ध भादंवी 323, 504, 506 सह कलम 75 बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
सोमवारी 5 डिसेंबर रोजी ही घटना घडली, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी घेतली. याप्रकरणी पोलिसांच्या तपासाअंती शिक्षकावर कारवाई करण्यात येईल, असंही शाळेच्या मुख्याध्यापिका मनश्री तावडे यांनी म्हटलं. तर या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेत पोलिसांनी तपास सुरु केला असल्याची माहिती पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांनी दिली.