कॉलेजसमोरच्या भोजनालयात मालक दाम्पत्याची आत्महत्या, मेसमध्येच गळफास घेतलेले मृतदेह आढळले
चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर रोडवरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समोर ममता भोजनालय आहे. या भोजनालयाचे मालक चंद्रभान दुबे (60 वर्ष) आणि त्यांची पत्नी मंजू दुबे (50 वर्ष) यांनी आत्महत्या केली
चंद्रपूर : चंद्रपुरात भोजनालय चालवणाऱ्या संचालक दाम्पत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर असलेल्या भोजनालयातच गळफास घेतलेल्या अवस्थेत दुबे दाम्पत्याचे मृतदेह आढळले. मात्र त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आत्महत्येच्या तीन-चार दिवसांनंतर ही घटना उघडकीस आली.
नेमकं काय घडलं?
चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर रोडवरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समोर माँ ममता भोजनालय आहे. या भोजनालयाचे मालक चंद्रभान दुबे (60 वर्ष) आणि त्यांची पत्नी मंजू दुबे (50 वर्ष) यांनी आत्महत्या केली. दोघांचेही मृतदेह भोजनालयातच आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत
भोजनालयाच्या लगतच्या टॉवर टेकडी, जुनोना रोड बाबुपेठ येथे दुबे दाम्पत्याचे वास्तव्य होते. भोजनालयात गळफास लावलेल्या अवस्थेत त्यांचे मृतदेह आढळले. त्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने ही आत्महत्या 3 ते 4 दिवसांपूर्वी केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही. चंद्रपूर शहर पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
कोल्हापुरात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या
दुसरीकडे, कोल्हापुरात त्रिकोणी कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काही महिन्यांपूर्वी उघडकीस आली होती. पन्हाळा तालुक्यातील दाम्पत्याने चिमुकल्यासह नदीत उडी घेतली. नदीत तिघांचे मृतदेह आढळले, तेव्हा आई-वडिलांचे हात लहान मुलाला दोरीने बांधलेल्या अवस्थेत होते.
पुण्यात दोन मुलांसह आई-वडिलांनी आयुष्य संपवलं
दरम्यान, पुण्यातही एकाच कुटुंबातील चौघांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. तिशीतील दाम्पत्याने दोन चिमुरड्यांना गळफास दिल्यानंतर स्वतःचंही आयुष्य संपवलं होतं. एक दिवस घराचा दरवाजा न उघडल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, तेव्हा फॅनच्या अँगलला नायलॉनच्या दोरीने चौघांनी गळफास घेतल्याचे दिसून आले होते.
संबंधित बातम्या :
कोरोनाने पतीचा अखेरचा श्वास, दोन मुलींना घरी ठेवून पत्नीची मुलासह आत्महत्या
कौटुंबिक आत्महत्यांचं वाढतं सत्र, चिमुकल्याला दोरीला बांधून कोल्हापुरात दाम्पत्याची नदीत उडी
(Chandrapur Mess Owner Couple allegedly committed Suicide)