आपसातील वादातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला, एकाचा मृत्यू दुसरा जखमी
या हल्ल्यात हर्षचा जागीच मृत्यू झाला तर अनिकेत गंभीर जखमी झाला. अनिकेतला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. आरोपी वेगवेगळ्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.
नागपूर : आपसातील वादातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर हल्ला (Attack) केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हर्ष डांगे असे हल्ल्यात मयत झालेल्या 22 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र अनिकेत कसार हा जखमी (Injury) झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आठ जणांना ताब्यात (Detained) घेतले आहे. आरोपींमध्ये काही जण अल्पवयीन आहेत.
दोघे मित्र महाविद्यालयाजवळ गेले होते
मयत हर्ष हा जी.एच. रायसोनी पॉलिटेक्निकचा माजी विद्यार्थी आहे. हर्ष आणि अनिकेत दोघे मित्र असून दुपारच्या सुमारास दोघेही महाविद्यालयाजवळ गेले होते. तेथे आधीपासूनच दीपांशू पंडित हा उभा होता. काही कळण्याच्या आतच हर्ष आणि अनिकेतवर चाकू हल्ला करण्यात आला.
हल्ल्यात हर्षचा जागीच मृत्यू तर अनिकेत गंभीर जखमी
या हल्ल्यात हर्षचा जागीच मृत्यू झाला तर अनिकेत गंभीर जखमी झाला. अनिकेतला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. आरोपी वेगवेगळ्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.
हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
दरम्यान, आरोपींनी हर्षची हत्या केली याबाबत अद्याप काही कळू शकले नाही. आरोपींच्या चौकशीनंतरच कोणत्या कारणातून हा हल्ला करुन हत्या केली हे स्पष्ट होईल.
घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी करुन पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलीस अधिक तपास करत आहेत.