चुलतभावाला घरी आश्रय दिला, त्याची वाईट नजर अल्पवयीन भाचीवरच गेली…
भाचीला शारीरिक संबंधाची मागणी करायचा. 2020 मध्ये कोरोना काळात बहिणीला कोरोना झाला असल्याने ती विलगीकरणात होती. त्यादरम्यान त्याने भाचीवर अनेकदा बलात्कार केला.
नागपूर : बहिणीच्या घरी राहायला आलेल्या चुलत मामाची आपल्या सोळा वर्षीय भाचीवर वाईट नजर गेली. त्याने नात्यागोत्याचा विचार न करता भाचीला जाळ्यात ओढून लैंगिक शोषण केले. तिचे वाईट अवस्थेतील फोटो प्रसार माध्यमांवर प्रसारित करून तिची बदनामी केली. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या त्या चुलत मामाला अटक केली.
लाड करण्याच्या बहाण्याने अश्लील चाळे
आरोपी पीडित मुलीच्या आईचा चुलत भाऊ आहे. हा बाजारगावजवळील एका खेड्यातील रहिवासी आहे. त्याच्या मोठ्या चुलत बहिणीचे लग्न नागपुरात झाले. बहिणीकडे तो राहायला आला. बहिणीकडे राहत असताना त्याची वाईट नजर दहावीत असलेली सोळा वर्षीय भाचीवर गेली. भाचीला लाड करण्याच्या बहाण्याने तिच्याशी तो अश्लील चाळे करीत होता. त्याची हिंमत वाढली आणि तिच्या खोलीत जाऊन अश्लील चाळे करायला लागला.
अल्पवयीन असलेल्या भाचीने याबाबत आईकडे तक्रार केली नाही. भाचीचे अश्लील छायाचित्र काढले. ते छायाचित्र दाखवून त्याने भाचीला शारीरिक सुखाची मागणी केली. भाचीनेही नाईलाजास्तव बदनामी होऊ नये म्हणून होकार दिला.
अनेकदा अत्याचार
तेव्हापासून हा केव्हाही भाचीला शारीरिक संबंधाची मागणी करायचा. 2020 मध्ये कोरोना काळात बहिणीला कोरोना झाला असल्याने ती विलगीकरणात होती. त्यादरम्यान त्याने भाचीवर अनेकदा बलात्कार केला.
तक्रार पीडित मुलीने केल्याने त्याला पोलिसांनी अटक केली. अशी माहिती गणेशपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बापू राऊत यांनी दिली. नात्याला काळिमा फासणारी ही घटना असल्याने विश्वास ठेवायचा तरी कोणावर हा प्रश्न पडायला लागला.