Nagpur Theft : नागपूरमध्ये चंदनाची झाडे चोरणारी टोळी जेरबंद, पाचपैकी दोन आरोपी अल्पवयीन
पुष्पा सिनेमांमध्ये चंदन तस्करी काय असते आणि त्याच्यातून किती मोठी कमाई असते हे पुढे आलं. त्यामुळे कदाचित या चोरट्यांनी पैसे कमविण्याच्या उद्देशाने राज्यपालांच्या निवासस्थानासह सरकारी कार्यालयापर्यंत चोरी करण्याची मजल गाठली.
नागपूर : नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी चंदनाची झाडे (Sandalwood Trees) चोरणाऱ्या काटोलच्या टोळीचा भांडाफोड केला आहे. यामध्ये पाच जणांना अटक (Arrest) करण्यात आली असून यातील दोन आरोपी हे अल्पवयीन (Minor) आहेत. नागपूर शहरातील वेगवेगळ्या सहा ठिकाणावरून चंदनाची चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. यामध्ये सरकारी निवासस्थानांचा सुद्धा समावेश आहे. या चोरांचे कनेक्शन उत्तर प्रदेशपर्यंत जोडले असल्याचं उघड झालं आहे. पुष्पा सिनेमांमध्ये चंदन तस्करी काय असते आणि त्याच्यातून किती मोठी कमाई असते हे पुढे आलं. त्यामुळे कदाचित या चोरट्यांनी पैसे कमविण्याच्या उद्देशाने राज्यपालांच्या निवासस्थानासह सरकारी कार्यालयापर्यंत चोरी करण्याची मजल गाठली. मात्र आता हे पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यामुळे आणखी कुठे कुठे यांनी चंदनाची चोरी केली आणि यात आणखी कुणाचा सहभाग आहे हे पुढे येण्याची शक्यता आहे.
या चोरट्यांचे कनेक्शन उत्तर प्रदेशमधील टोळीसोबत असल्याचं उघड
गेल्या काही काळामध्ये नागपुरात चंदनाच्या झाडांची चोरी होत असल्याचं समोर आलं. त्यामध्ये राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनातील चंदनाच्या झाडाची सुद्धा चोरी झाली होती. त्याचप्रमाणे अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या बंगल्यांमध्ये असलेले चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरात जवळपास सहा घटना घडल्याने याचा तपास गुन्हे शाखा पोलिसांनी आपल्याकडे घेतला आणि चौकशी सुरू केली. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एकाचा शोध पोलिसांना लागला आणि पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकत पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी सहा ठिकाणी केलेल्या चोरीचा कबुली दिली. मात्र हे चंदन कुठे जात होतं याचा शोध घेत असताना पोलिसांना या चोरट्यांचे कनेक्शन उत्तर प्रदेशमधील कान्होज येथील टोळीसोबत असल्याचं समोर आलं. आता पोलीस हे चंदन विकत घेणाऱ्या शमीम पठाणचा शोध घेत आहेत.(Five accused of stealing sandalwood trees arrested in Nagpur)