Gadchiroli Leopard : धुमाकूळ घालणाऱ्या हिंस्र बिबट्याचा संशयास्पद मृत्यू! वाघाची शिकार, विष देऊन ठार की आणखी काही?
मागील एक वर्षात याच मृत बिबट्याने अनेक वन्य प्राण्यांना आणि पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवला होता. अनेक प्राण्यांना या हिंस्र बिबट्यानं हल्ल्यात ठार केलं होतं. अद्याप या बिबटयाचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, हे स्पष्ट झालेलं नाही
गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli News) भागात वाघाचे आणि बिबट्याचे हल्ले ही काही नवीन बाब नाही. मात्र वाघाचा किंवा बिबट्याचा मृत्यू (Leopard Death) झाल्यानंतर त्याची चर्चा झाली नाही, तरच नवल. गेल्या काही आठवड्यांपासून गडचिरोलीत धुमाकूळ घालणाऱ्या हिंस्र बिबट्याचा मृत्यू झाल्यानं आता संशय बळावला आहे. या बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक आहे, त्याला विष देऊन ठार मारलंय की त्याच्या मृत्यूमागे आणखी काही वेगळं कारण आहे, यावरुन गडचिरोलीत चर्चांना उधाण आलंय. गडचिरोलीमधील धानोरा (Dhanora) तालुक्यामध्ये बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झालाय. बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी वनविभागाकडूनही गंभीर दखल घेण्यात आली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून या हिंस्र बिबट्याने अनेक वन्य प्राण्यांसह पाळीव प्राण्यांनाही आपलं लक्ष्य बनवलं होतं. अनेक वन्य प्राण्यांसह पाळीव प्राण्याची शिकार करणाऱ्या बिबट्याच्या मृत्यूबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे. वनविभागाकडून आता याप्रकरणी पुढील तपास केला जातोय.
हिंस्र बिबट्याचा मृत्यू
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात बिबट्याच्या संशयाच्या भोवऱ्यात साडला आहे. धानोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत कक्ष क्रमांक 510 मध्ये सागवान जंगलाच्या प्लांटेशनमध्ये मृत बिबट्या आढळला. या मृत बिबट्याची वन विभागाच्या वतीने पाहणीदेखील करण्यात आली. प्राथमिक पाहणीत या बिबट्या अंगावर काही जखमा आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, यावरुन शंका घेतली जातेय. बिबट्याचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाला आहे की बिबट्याची शिकार करण्यात आली आहे, याचा तपास केला जातोय.
मागील एक वर्षात याच मृत बिबट्याने अनेक वन्य प्राण्यांना आणि पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवला होता. अनेक प्राण्यांना या हिंस्र बिबट्यानं हल्ल्यात ठार केलं होतं. अद्याप या बिबटयाचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, हे स्पष्ट झालेलं नाही. सध्या घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले असून वन विभागाचे पंचनामे सुरू आहे. या बिबट्याच्या मृत्यूचं कारण समोर आल्यानंतर त्याबाबत अधिकृतपणे माहिती दिली जाईल, असं वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आलंय. सध्या सुरु असलेल्या तपासातून नेमकी काय माहिती समोर येते, याकडे वन्यप्रेमींसह धानोरामधील लोकांचंही लक्ष लागलंय.