11 वर्षांच्या मुलासोबत फुटबॉल खेळताना असं काय घडलं की तो जीवानिशीच गेला?
पालकांनो, सावधान! सहावीतील विद्यार्थ्याचा फुटबॉल खेळताना अचानक मृत्यू झाल्यानं खळबळ
गोंदिया : मृत्यू कुणाला कुठे कसा गाठेल, याचा काहीही नेम नाही. हेच अधोरेखित करणारी एक धक्कादायक घटना गोंदिया (Gondia News) जिल्ह्यात घडली. गोंदिया जिल्ह्यातील एका शाळेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मैदानात खेळतेवेळी अचानक मृत्यू (6th STD Student died) झाला. मैदानात भोवळ येऊन पडलेल्या या विद्यार्थ्याला शाळेतील कर्मचारी वर्गाने तातडीने डॉक्टरांकडे नेलं. पण तिथे या विद्यार्थ्याला मृत घोषित करण्यात आल्यानं सगळेच हादरुन गेले. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव (Arjuni Morgaon) तालुक्यातील नवोदय विद्यालयात घडली.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावीचा विद्यार्थी शाळेच्या मैदानात फुटबॉल खेळत होता. खेळता खेळता अचानक विद्यार्थ्याला भोवळ आली आणि तो जागीच कोसळला. मृत विद्यार्थ्याचं नाव संगम खिलेश्वर बोपचे असं असून त्याचं वय 11 वर्ष होतं.
गोंदिया जिल्ह्यातील सोनी गोरेगाव येथे राहणारा हा विद्यार्थी नवेगाव बांध येथील नवोदय विद्यालयाच्या मैदानावर मित्रांसोबत फुटबॉल खेळत होता. खेळता खेळता संगम बोपचे अचानक भोवळ येऊन मैदानावरच कोसळला होता. त्यामुळे इतर मित्रही घाबरुन गेले. त्यांनी लगेचच शिक्षकांना याबाबत कळवलं.
नवोदय विद्यालयाच्या शिक्षकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगावबांध येथं संगम बोपचे याला नेलं. तिथं त्याच्यावर तपासणी करुन त्याला साकोली येथील हृदयरोग डॉक्टरांकडे नेण्यात आला.
पण उपचारादरम्यान त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे. 11 वर्षांच्या मुलाचा खेळताना भोवळ येऊन मृत्यू झाल्याचं कळल्यानंतर बोपचे कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. मृत विद्यार्थ्याच्या पालकांच्या मनावर या घटनेनं मोठा आघात झालाय. तर संपूर्ण शाळाही हादरुन गेलीय.