तरुणीसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न, जागरुक नागरिकांनी उधळला आरोपीचा कट
भर वस्तीमध्ये एखाद्या युवतीला रस्त्यावरून ओढत नेण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे. तसेच तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
नागपूर : कामावरून घरी परतत असलेल्या एका युवतीला एका व्यक्तीने जबरदस्तीने तोंड दाबून झाडी परिसरात घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिच्या सोबत झटापट करण्याचा प्रयत्न केला. मात्र जागरूक नागरिकांच्या ही बाब लक्षात आली आणि त्या ठिकाणी पोहचत नागरिकांनी त्या आरोपीला पकडलं. यामुळे एक मोठी घटना नागरिकांच्या सतर्कतेने टळली. हुडकेश्वर परिसरात ही घटना घडली आहे.
तरुणी कामावरुन घरी जात होती
हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील नाग मंदिरजवळ एक बाजार आहे. या बाजाराच्या बाजूलाच वस्ती आहे. त्या ठिकाणी काहीसा सुमसान परिसर आणि झाडी झुडूप आहे. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास एक युवती आपलं कामकाज आटोपून घरी जात असताना तिच्यामागून एक युवक आला.
मागून आलेल्या तरुणाने तिला झुडुपात ओढत नेलं
या युवकाने तिचं तोंड दाबलं आणि बाजूला असलेल्या झाडीझुडपाकडे ओढत नेलं. त्या ठिकाणी तो तिच्यावर झटापट करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्या ठिकाणी असलेल्या एका भाजीवालीच आणि समोर असलेल्या दुकानदाराचं लक्ष याकडे गेलं. त्या दोघांनी जाऊन युवतीची सुटका केली.
तिने आरडाओरड केल्यामुळे बाजारात असलेले काही नागरिक सुद्धा तिकडे धावत गेले आणि त्या विकृत युवकाला पकडून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोहोचत त्या आरोपीला अटक केली.
तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
आरोपी एका हलवाईच्या दुकानात काम करतो. युवतीसोबत त्याचा कुठलाही परिचय नव्हता. भर वस्तीमध्ये एखाद्या युवतीला रस्त्यावरून ओढत नेण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे. तसेच तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.