कैद्यांचे कपडे घालायला सांगितले म्हणून राग अनावर, कैद्याकडून तुरुंग अधिकाऱ्याला मारहाण
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी यार्ड मधील कैदी साहिल काळसेकर याने कैद्यांचे कपडे न घालता सामान्य कपडे घातले होते. यावरुन तुरुंग अधिकाऱ्याने त्याला टोकले आणि कैद्यांचे कपडे घालण्यास सांगितले.
नागपूर : कैद्यांचे कपडे घालायला सांगितले म्हणून एका कैद्याने तुरुंग अधिकाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना नागपूर मध्यवर्ती कारागृहात घडली आहे. या प्रकरणी नागपुरच्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. साहिल अजमल काळसेकर असे मारहाण करणाऱ्या कैद्याचे नाव आहे. काळसेकर याला रत्नागिरी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यानंतर त्याची रवानगी नागपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. त्याला फाशी यार्डमध्ये ठेवण्यात आलं आहे.
कैद्यांचे कपडे घालण्यास सांगितले म्हणून संतापला
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी यार्ड मधील कैदी साहिल काळसेकर याने कैद्यांचे कपडे न घालता सामान्य कपडे घातले होते. यावरुन तुरुंग अधिकाऱ्याने त्याला टोकले आणि कैद्यांचे कपडे घालण्यास सांगितले.
तुरुंग अधिकाऱ्यालाच केली मारहाण
यामुळे काळसेकर हा कैदी संतापला आणि त्याने तुरुंग अधिकारी वामन निमजे यांना मारहाण केली. या घटनेमुळे नागपूर जेलमध्ये खळबळ उडाली असून, नागपूर जेल पुन्हा चर्चेत आलं आहे.
काळसेकर हा बलात्कार प्रकरणातील आरोपी असून, सध्या नागपूर तुरुंगात शिक्षा भोगत आहे. नागपूर कारागृह सर्वात सुरक्षित आणि कडक सुरक्षाव्यवस्था असलेले मानले जाते. यामुळे या कारागृहात कैद्याकडून अधिकाऱ्याला मारहाणीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांचा राडा
अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी राडा केल्याची घटना सोमवारी घडली. पुण्याच्या येरवडा कारागृहातून रिटर्न आलेल्या न्यायाधीन कैद्यांनी धुडगूस घालत दोन कैद्यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी आठ कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कैद्यांची मारामारी रोखण्यासाठी कारागृहातील पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. जखमी कैद्यांवर कारागृहाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.