दारुच्या गुत्त्यावर किरकोळ वाद, नागपुरात तिघा मित्रांकडून तरुणाची हत्या
सुरेंद्र आनंद पीलघर याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी निलेश शाहु, अरुण जनमत सिंह आणि बबलू रामाधर स्लोडिया यांना अटक केली आहे. मृत तरुण आणि आरोपी हे सर्व बांधकाम मजूर असून एकमेकांचे निकटवर्तीय परिचित होते
नागपूर : दारुच्या गुत्त्यावर मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. नागपूरच्या एमआयडीसी परिसरातील राजीवनगर येथील जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात ही घटना घडली होती.
सुरेंद्र आनंद पीलघर याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी निलेश शाहु, अरुण जनमत सिंह आणि बबलू रामाधर स्लोडिया यांना अटक केली आहे. मृत तरुण आणि आरोपी हे सर्व बांधकाम मजूर असून एकमेकांचे निकटवर्तीय परिचित होते. सर्व जण नियमितपणे एकत्र दारुही प्यायचे.
नेमकं काय घडलं?
सुरेंद्र हा भाजीपाला आणण्यासाठी घरून बाहेर पडला होता, मात्र वाटेत त्याला दोघे मित्र त्याला भेटले. त्यामुळे सुरेंद्र भाजीपाला घ्यायचे विसरून दारु पिण्यासाठी गुत्त्यावर गेला. तिथे तिघेही आरोपी आधीच दारु पित होते. दारुच्या नशेत सुरेंद्र आणि त्याच्या मित्रांसोबत आरोपींची बाचाबाची झाली. त्यानंतर तिथून सगळे निघून गेले. मात्र वाटेत जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आरोपींनी सुरेंद्रला गाठले आणि धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
तिघांना अटक, चाकूही जप्त
परिसरातील नागरिकांना सुरेंद्रचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. नागरिकांनी लागलीच याची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. पोलिसांनी मयताची ओळख पटवल्यानंतर तपासाला सुरुवात केली, तेव्हा मृतक सुरेंद्रला दारूचे व्यसन होते आणि त्यातून काल त्याचा आरोपींसोबत वाद झाल्याची माहिती हाती आली. पोलिसांनी या प्रकरणात तीनही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून हत्या करण्यासाठी वापरलेला चाकूही जप्त केला आहे.
संबंधित बातम्या :
पत्नीच्या चारित्र्यावर संशय, मुंबईत पतीने 12 वर्षांच्या मुलीला चाकूने भोसकले
पुण्यात दोघांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला, सात जणांचं फरार टोळकं अखेर जेरबंद