नागपुरात मायलेकीच्या हत्येने खळबळ, विवाहितेचा गळा आवळला, अल्पवयीन मुलीला दगडाने ठेचलं
पती-पत्नीमध्ये काहीतरी वाद झाला आणि त्याने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचा संशय आहे. पत्नीसोबतच 10 वर्षीय मुलीचाही त्याने दगडाने ठेचून हत्या केल्याचा आरोप आहे.
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर परिसरात दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेची गळा आवळून, तर 10 वर्षीय मुलीची दगडाने ठेचून हत्या करुन आरोपी फरार झाला आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.
काय आहे प्रकरण?
कळमेश्वर परिसरातील झुणकी मार्गावर श्रावण घोडपागे यांचं शेत आहे. त्यांनी ते शेत भाड्याने दिलं आहे. ज्यांना शेत देण्यात आलं आहे, त्यांनी शेतात काम करण्यासाठी मध्य प्रदेशमधील एका कुटुंबाला नोकरीसाठी ठेवलं होतं. राकेश साहू हा पत्नी आणि 10 वर्षीय मुलीसोबत शेतातच झोपडी टाकून राहत होता.
नेमकं काय घडलं?
पती-पत्नीमध्ये काहीतरी वाद झाला आणि त्याने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचा संशय आहे. पत्नीसोबतच 10 वर्षीय मुलीचाही त्याने दगडाने ठेचून हत्या केल्याचा आरोप आहे.
आरोपी पसार, शोध सुरु
आरोपी राकेश साहू पसार झाला आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत चौकशी सुरु केली आहे. आरोपीचा शोध घेतला जात असून या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.
मीरा रोडमध्ये आई आणि दोन मुलांचे मृतदेह
दरम्यान, मीरा रोडच्या नरेंद्र पार्क परिसरातील एकाच घरात तिघांचे मृतदेह आढळल्याने काही दिवसांपूर्वी एकच खळबळ उडाली होती. आई, मुलगा आणि मुलगी यांचे मृतदेह राहत्या घरात सापडले होते. मुंबई जवळच्या मीरा रोडच्या नया नगर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली होती. एकाच कुटुंबातील तिघांच्या संशयास्पद मृत्यूने चिंतेचं वातावरण पसरलं आहे. आई नसरीन वाघू (वय 47 वर्ष), मुलगी सदाद नाझ (21 वर्ष) आणि 13 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला आहे. मुलगा आणि मुलगी दोघे गतिमंद असल्याची माहिती समोर आली होती.
कल्याणमध्ये महिलेची हत्या, पतीवर संशय
दुसरीकडे, कल्याणच्या हाय प्रोफाईल गांधारी परिसरात दिवसाढवळ्या एका घरकाम करणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळल्याने काही दिवसांपूर्वी एकच खळबळ उडाली होती. कल्याण पश्चिमेतील हाय प्रोफाईल गांधारी परिसरात रिंग रोड रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मयत महिलेचे नाव लक्ष्मी मोहिते होते. लक्ष्मीची हत्या दगडाने ठेचून करण्यात आली होती. ती त्याच परिसरात घरकाम करत असे. लक्ष्मी ही भिवंडीतील सावद गाव परिसरात राहत होती. लक्ष्मीची हत्या तिचा पती जर्नादन मोहिते याने केल्याचा आरोप झाला होता.
संबंधित बातम्या :
मायलेकीसह अल्पवयीन मुलगा राहत्या घरी मृतावस्थेत, मीरा रोडमध्ये खळबळ
28 वर्षीय पत्नीसह एक वर्षाच्या मुलाची हत्या, पुण्यात पतीची गळफास घेऊन आत्महत्या
कोरोना झाल्याच्या रागातून पत्नीची हत्या, स्टेशन मास्तर पतीची आत्महत्या