Nagpur Murder | बारमध्ये रागाने पाहिल्यावरुन वाद, नागपुरात तरुणाची निर्घृण हत्या
नागपूरच्या सदर परिसरात आरोपी विलसन आणि त्याचे मित्र एका बारमध्ये दारु पित बसले होते. तेवढयात त्याच बारमध्ये मृतक सागर संजय साहू हा सुद्धा मित्रांसोबत दारू प्यायला गेला. दोघांचे टेबल समोरासमोर होते.
नागपूर : रागाने घुरून पाहिलं म्हणून नागपुरात एकाची हत्या (Nagpur Crime News) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला आरोपीला अटक केली आहे, तर इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. महत्त्वाचं म्हणजे नागपुरात दोन दिवसात हत्येच्या दोन घटना (Murder) समोर आल्या आहेत. बारमध्ये समोरासमोर टेबलवर दारु पित बसलेल्या टोळक्यात खुन्नस देण्यावरुन वाद झाला. मयत तरुण आणि आरोपीमध्ये जुना वाद होताच, मात्र बारमध्ये रागाने पाहिल्यावरुन (Stare) तो पुन्हा उफाळून आला. बारबाहेर पडल्यानंतर दोघं पुन्हा समोरासमोर आले. त्यानंतर आरोपीने जवळचा चाकू काढून तरुणाच्या मान आणि कंबरेवर सपासप वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत तरुणाला हॉस्पिटलमध्ये नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
काय आहे प्रकरण?
नागपूरच्या सदर परिसरात आरोपी विलसन आणि त्याचे मित्र एका बारमध्ये दारु पित बसले होते. तेवढयात त्याच बारमध्ये मृतक सागर संजय साहू हा सुद्धा मित्रांसोबत दारू प्यायला गेला. दोघांचे टेबल समोरासमोर होते.
मानेवर आणि कंबरेवर वार
मृतक आणि आरोपी यांच्यामध्ये जुना वाद होता, मात्र मृतकाने त्याच्या कडे घुरुन पाहिलं म्हणून दोघात वाद झाला. दोघंही बारच्या बाहेर पडले आणि समोरासमोर आले. आरोपीने स्वतः जवळ असलेला चाकू काढून त्याच्या मानेवर आणि कंबरेवर वार केले. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
नागपुरात हत्यांचं सत्र
नागपुरात कोणाची हत्या करण्यासाठी काही मोठ्या कारणांची आवश्यकता नसते, हे या आधीसुद्धा दिसून आलं . या हत्या प्रकरणात सुद्धा अगदी छोटं कारण आहे, मात्र त्यासाठी जीव गमवावा लागला.
काल झालेली घटना सुद्धा क्षुल्लक कारणामुळेच घडली होती. नागपूरच्या भालंदारपुरा परिसरात एकाची हत्या करण्यात आली होती. अंकुश तायवाडे असं मृतकाच नाव असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली . त्यामुळे नागपुरात नेमकं चाललं तरी काय असे प्रश्न उपस्थित व्हायला लागले आहेत.