30 प्रवाशांनी भरलेली खासगी बस उलटली! 5 जण जखमी, नागपुरातील हिंगणी-सेलू मार्गावर भीषण अपघात
Nagpur Accident : नागपूरकडून हिंगणीमार्गे वर्धाकडे जाणारी ही ट्रॅव्हल्स बस असल्याचं कळतंय. पेंढरी घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.
नागपूर : नागपूर (Nagpur Accident) जिल्ह्यातील हिंगणी-सेलू (Hingani-Selu Rout) मार्गावरील पेंढरी जवळ एक खाजगी बस उलटली. या बसमध्ये 30 प्रवासी होते. त्यापैकी 5 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळतेय. अजून पर्यंततरी कुठलीही जीवितहानी झालेली नाही. नागपूरकडून हिंगणीमार्गे वर्धाकडे जाणारी ही ट्रॅव्हल्स बस (Private Bus accident) असल्याचं कळतंय. पेंढरी घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात रवाना केलंय. पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय.
खासगी बसचा हा अपघात इतका भीषण होता, की अपघातग्रस्त बस रस्ता सोडून एका बाजूला पूर्णपणे कलंडली होती. ज्या बाजून प्रवास बसमध्ये चढतात तोच भाग खालच्या बाजूला गेल्यानं प्रवासी बसच्या आतमध्ये एकाएकी अडकले गेले होते. या अपघातामुळे प्रवाशांची एकच घाबरगुंडी उडाली होती.
भरधाव वेगामुळे खासगी बस चालकाचं वळणावर नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडला असावा, अशी शंका घेतली जातेय. या अपघाताची पोलिसांनी नोंद केली असून पुढील बचावकार्य केलं जातंय.
पाहा लाईव्ह घडामोडी : Video
अपघातानंतर अनेक प्रवासी हे जमिनीवर कोसळल्याचं दिसून आलंय. काहीच मदत मिळत नसल्यानं प्रवाशांनी अपघातानंतरचं अंगावर काटा आणणार दृश्यं कॅमेऱ्यात कैद केलं आहे. यामध्ये एका शेताच्या मळ्यात बस पलटी झाल्याचं दिसतंय. या बसच्या काचाही तुटल्यात. तसंच बसच्या पुढच्या चाकांनाही जबर मार बसल्याचं दिसून येतंय.
या अपघातातील इतर प्रवाशांची मदत करण्यासाठी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. सध्या या ठिकाणी बचावकार्य केलं जातंय. दरम्यान, अनेक प्रवाशांना मुका मार लागला असून काही प्रवासी किरकोळ जखमी झालेत. दरम्यान, या अपघातामुळे अनेकजण धास्तावलेत. थोडक्याच वाचल्यानं बसमधील अनेक प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडलाय.
गेल्या 12 तासांच्या आत विदर्भात दुसरा भीषण झाला आहे. पहाटे बुलढाण्यात एका एसटी बसने तिघांना चिरडलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे या एसटी बसचा उजव्या बाजूचा पत्रा बाहेर आलेला होता. तो दोघांना लागल्याने त्यांचा हातच थेट कापला गेला. तर धडक बसल्याने तिसरी व्यक्ती दूरवर फेकली गेली. अपघाताची ही घटना ताजी असतानाच आता नागपूरमध्येही खासगी बसचा अपघात झाला आहे. त्यामुळे विदर्भात अपघात सत्र सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळालंय.