नागपूर पुन्हा क्राईम कॅपिटल, धक्कादायक आकडेवारी उघड
'एनसीआरबी'च्या आकडेवारीनुसार 2021 मध्ये लोकसंख्येच्या तुलनेत गुन्हेदर लक्षात घेतला तर नागपूर शहराचा गुन्हेगारीमध्ये राज्यात पहिला आणि देशात आठवा क्रमांक आहे.
नागपूर : गेल्या काही दिवसात नागपुरात पुन्हा गुन्हेगारी (Crime)नं डोकं वर काढल्याचं चित्र आहे. ‘एनसीआरबी'(NCRB) च्या आकडेवारी नुसार गुन्हे दरात नागपूर राज्यात अव्वल असल्याची धक्कादायक आकडेवारी पुढं आली आहे. गृहमंत्र्यांच्या नागपुरात क्राईम रेट वाढत असल्याने देवेंद्र फडणवीसां (Devendra Fadanvis)समोर गुन्हेगारी नियंत्रित करण्याचं मोठं आव्हान आहे.
गुन्हेगारीमध्ये मुंबईलाही मागे टाकले
‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार 2021 मध्ये लोकसंख्येच्या तुलनेत गुन्हेदर लक्षात घेतला तर नागपूर शहराचा गुन्हेगारीमध्ये राज्यात पहिला आणि देशात आठवा क्रमांक आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारीमध्ये नागपूरने मुंबई, लखनऊ, पाटणा आणि गाझियाबाद या शहरांना देखील मागे टाकले आहे.
दखलपात्र गुन्ह्यांचा दर लाखाला 892.8 इतका
‘एनसीआरबी’ च्या आकडेवारीनुसार 2021 मध्ये 22 हजार 302 दखलपात्र गुन्हे नोंदविले गेलेत. 2020 च्या तुलनेत हा आकडा 15.85 टक्क्यांनी जास्त आहे. यावर्षी नागपुरात दखलपात्र गुन्ह्यांचा दर लाखाला 892.8 इतका आहे.
पोलीस आयुक्तांनी आकडेवारी खोटी म्हटले
मुंबई, पुणे शहरांची लोकसंख्या जास्त असली तरी तिथला दर लाखाच्या मागील गुन्हेगारी कमी आहे. मात्र, नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ही आकडेवारी खरी नसल्याचं म्हटलं आहे.
‘एनसीआरबी’कडे असलेली लोकसंख्या ही 2011 ची आहे. त्यावेळी नागपूर शहराची लोकसंख्या कमी होती. त्यामुळं गुन्ह्यांची आकडेवारी अधिक दिसते आहे. मात्र, आता लोकसंख्या वाढली आहे. आणि त्या तुलनेत नागपूर शहरातील गुन्हेगारी कमी झाली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
अव्वल नसले तरी नागपुरात गुन्हेगारी वाढतेय
पोलीस आयुक्तांच्या म्हणण्यानुसार नागपूर शहर राज्यात गुन्हेगारीमध्ये अव्वल नसले तरी गेल्या काही दिवसांत गुन्हेगारी वाढत चाललीय हे मात्र खरं आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांपुढं नागपुरातील गुन्हेगारी कमी करण्याचं नक्कीच आव्हान आहे. (Nagpur again crime capital, NCRB report reveals shocking statistics)