Nagpur : पप्पांनी तक्रार केली म्हणून मुलगा गजाआड! मुलाचा नेमका गुन्हा काय?
नागपूरच्या शांती नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चकीत करणारा प्रकार!
नागपूर : नागपूरच्या (Nagpur Crime News) शांती नगर परिसरातील (Shanti Nagar, Nagpur) चोरीची एक अजब घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी एका इसमाने पोलिसांत चोरीची तक्रार दिली. तब्बल 70 लाख रुपयांच्या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली होती. अखेर पोलिसांनी (Nagpur Police) 48 तासांतच चोरीचा छडा लावलाय. चकीत करणारी बाब म्हणजे चोरी प्रकरणी फिर्याद देणाऱ्या व्यक्तीच्या मुलालाच प्रमुख आरोपी म्हणून अटक करण्यात आलीय. अटक करण्यात आलेल्या आरोपींची आता पोलिसांकडून कसून चौकशी केली जातेय.
नागपूर शिंती नगर पोलीस स्टेशनच्या क्राईम ब्रांच युनिट तीनच्या पथकाने चोरीप्रकरणी दोघा जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी एक जण हा तर चक्क ज्याने चोरीची तक्रार दिली, त्याचाच मुलगा असल्याचं समोर आलंय. या चोरी प्रकरणाचा छडा लागल्यानंतर फिर्यादीलाही आश्चर्याचा धक्का बसलाय.
दोन दिवसांपूर्वी शांती नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली होती. अखेर नागपूर शांती नगर पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट तीनच्या पथकाने 48 तासांतच या चोरी प्रकरणाचा पर्दाफाश केलाय.
शांतीनगर परिसरातील जावेद थारा या इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकाच्या घरी रविवारी मोठी धाडसी चोरी झाली होती. त्यामध्ये एक किलो सोने आणि इतर मुद्देमाल असा एकूण 73 लाख रुपयाची चोरी झाली होती. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तांत्रिक पद्धतीने तपास केला.
चोरीच्या दिवशी थारा कुटुंब कामठी येथील एका विवाह समारंभात गेले होते. घरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक तिजोरीतून ही चोरी झाल्याने पोलिसांना वेगवेगळ्या संशय आले. त्यांनी जवळच्या लोकांची तपासणी सुरू केली. मात्र हाती काही लागलं नव्हतं.
अखेर पोलिसांनी उलट तपासणी करायला सुरुवात केली. या चौकशीतून धक्कादायक उलगडा झाला. चोरी करणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर व्यावसायिकाचा मुलगाच असल्याच पुढे आलं.
व्यसन आणि चैनीत राहायची सवय असल्यामुळे वडिलांन सोबत मुलाचे सारखे वाद व्हायचे. त्यातूनच त्याने चोरी केल्याचं उघड झालं. जाफर जावेद थारा आणि त्याचा मित्र वहिद ली यांनी ही चोरी केली. मात्र कोणाला आपल्यावर संशय येऊ नये म्हणून जाफर कामठी येथे जाऊन लग्न समारंभात सामील झाला.
पोलिसांनी आपल्या पद्धतीने उलट तपासणी केली असता त्याने याची चोरीची कबुली दिली. नागपुरात गेल्या काही दिवसात चोरीच्या घटना वाढल्यात. मात्र ही चोरी मोठी होती. चक्क मुलानेच स्वतःच्या घरी चोरी केल्याने आणि स्वतःच्या वडिलांसोबतच्या वादातून हे कृत्य केल्याचं समोर आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
एकूण 13 लाख रुपयांची रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांसह तब्बल 60 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचं आता कौतुक होतंय. सध्या पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरु आहे.