Wardha Crime : आठवीतील मुलीवर लैंगिक आश्रम शाळेत अत्याचार! आश्रम शाळेच्या अधीक्षकाचंच संतापजनक कृत्य
Wardha Crime News : मुलीला चांगले शिक्षण मिळावे या हेतूने पीडितेच्या आई-वडिलांनी तिला चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील एका खासगी आश्रम शाळेत 7 जुलै रोजी टाकले. पण...
वर्धा : वर्धा (Wardha Crime News) जिल्ह्यातील हिंगणघाट येथील एका 13 वर्षांच्या आठवीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार (Girl Molestation) करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिचे वडील तिला चंद्रपूरहून (Chandrapur Crime News) घरी हिंगणघाट येथे घेऊन आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. याप्रकरणी वर्ध्यातील हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीवर आश्रम शाळेतील अधीक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आल्यानं संताप व्यक्त केला जातो आहे. सध्या या लैंगिक अत्याचारप्रकरणाचा पुढील तपास चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास केला जात असून रविवारी याबाबत तक्रार दाखल करम्यात आली होती. आश्रम शाळेतील अधीक्षकाने केलेल्या संतापजनक कृत्यामुळे चंद्रपूरसह वर्ध्यातील हिंगणघाटमध्येही खळबळ माजलीय.
संशयिताविरोधात गुन्हा
आठवीमध्ये शिकणाऱ्या 13 वर्षीय मुलीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील एका खासगी आश्रम शाळेतील अधीक्षकाने लैंगिक अत्याचार करून पेशालाच काळामा फासला. हे धक्कादायक प्रकरण हिंगणघाट पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर उघडकीस आले. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी संशयित आरोपी असलेल्या आश्रम शाळेतील अधीक्षक संजय एकनाथ इटनकर (53) याच्या विरुद्ध अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पण घटनास्थळ चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याचे हे प्रकरण पुढील तपासासाठी भद्रावती पोलिसांकडे वळते करण्यात आले आहे.
कळलं कसं?
पीडितेचे आई-वडील चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून ते दोघेही दोन महिन्यांपूर्वी हिंगणघाट येथे राहायला आलेत. मुलीची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाल्यावर पीडितेच्या वडिलांनी आश्रम शाळा गाठली. शिवाय मुलीला हिंगणघाट येथे आणले. त्यानंतर मुलीच्या पोटाखाली दुखत असल्याचे तिने शेजारील महिलेला सांगिल्यावर हा धक्कादायक प्रकार पुढे आला.
मुलीला चांगले शिक्षण मिळावे या हेतूने पीडितेच्या आई-वडिलांनी तिला चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील एका खासगी आश्रम शाळेत 7 जुलै रोजी टाकले. पण हिंगणघाट येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या पीडितेच्या वडिलांना 4 ऑगस्टला शाळेतून फोन आला. तुमच्या मुलीची प्रकृती खराब आहे. तिला व तिचा शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही घेऊन जा, असे शाळेतून सांगण्यात आले. पण सततच्या पावसामुळे पीडितेचे वडील आश्रम शाळेत थोडे उशिराच पोहोचले. मुलीला सोबत घेऊन हिंगणघाटला परतल्यावर 13 वर्षीय मुलीवर 53 वर्षीय अधीक्षकांने लैंगिक अत्याचार केल्याचे पुढे आले.
पीडितेला तिच्या वडिलांनी हिंगणघाट येथील घरी आणल्यावर घरमालकीणीने मुलीला प्रकृतीबाबत सहज विचारणा केली. अशातच मुलीसोबत काही तरी अनुचित प्रकार झाल्याचे घरमालकीनच्या लक्षात आले. त्यानंतर हिंगणघाट पोलीस स्टेशन गाठण्यात आले. तक्रारीनंतर पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. आता याप्रकरणी चंद्रपुरातील भद्रावती पोलीस पुढील तपास करत आहेत.