टेरेसवर गाणं ऐकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, वर्ध्यात तरुणाला सश्रम कारावासाची शिक्षा
छतावर उभी राहून मोबाईलमध्ये गाणे ऐकत असलेली तरुणी एकटी असल्याचे हेरुन आरोपी मिलिंद राऊतने तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
वर्धा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 33 वर्षीय मिलिंद पांडुरंग राऊत (रा. साबळे लेआऊट, वर्धा) असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे. वर्ध्यात अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची घटना घडली होती.
नेमकं काय घडलं?
छतावर उभी राहून मोबाईलमध्ये गाणे ऐकत असलेली तरुणी एकटी असल्याचे हेरुन आरोपी मिलिंद राऊतने तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज तेलगोटे यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले.
न्यायालयात शासकीय बाजू अॅड. गिरीश तकवाले यांनी मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार शंकर कापसे यांनी काम पाहिले. या प्रकरणी चार साक्षीदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली.
दोन वर्षांचा सश्रम कारावास
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे लक्षात घेऊन जिल्हा न्यायाधीश 2 आर. व्ही. आदोने यांनी आरोपी मिलिंद पांडुरंग राऊत याला भादंविच्या कलम 354 (अ) (1) (ii) अन्वये दोन वर्षांचा सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याचा साधा कारावास, कलम 345 (ड) (1) (i) नुसार दोन वर्षांचा सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच कलम 357 (1) अन्वये पीडितेस नुकसान भरपाई म्हणून तीन हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईत डॉक्टरकडून नर्सचा विनयभंग
दुसरीकडे, मुंबईजवळच्या नालासोपारा भागात डॉक्टरनेच नर्सचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. डॉक्टरने हॉस्पिटलमध्ये 21 वर्षीय परिचारिकेचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी डॉक्टर परागंदा झाला होता
संबंधित बातम्या :
औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न
काविळीचे निदान करताना विवाहितेचा विनयभंग, आरोपीला पतीकडून बेदम चोप
(Wardha man sentenced two years jail for molesting minor girl)