Wardha Accident : जेवणानंतर वॉकसाठी बाहेर पडलेल्या दाम्पत्याला भरधाव वाहनाची धडक, पती ठार! पत्नी थोडक्यात वाचली
Wardha Accident News : वर्धा जिल्ह्याच्या कारंजा घाडगे येथील गवंडी मार्गांवर जेवणानंतर इव्हनिंग वॉक करण्यासाठी गेले होते.
वर्धा : वाहनाच्या धडकेत पतीचा मृत्यू (Husband died) झाला, तर पत्नी थोडक्यात बचावल्याची घटना वर्ध्यात घडली. जेवणानंतर वॉकसाठी गेलेल्या दाम्पत्याला भरधाव वाहनानं धडक (Wardha Accident News) दिली. यात पत्नीच्या देखत पतीचा अपघातात मृत्यू झाला. तर बचावलेल्या पत्नीला पतीच्या मृत्यूने मोठा धक्का बसलाय. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्याच्या गवंडी रस्त्यावर हा भीषण अपघात (Wardha road accident) झाला. या अपघाताप्रकरणी आरोपी वाहनचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. या अपघातात मृत्यू झालेला व्यक्ती पेशाने शिक्षक होता. शनिवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात गाखरे दाम्पत्यावर काळानं घातला. गाखरे कुटुंबीयावर या अपघातानं दुःखाचा डोंगर कोसळलाय.
नेमकं काय घडलं?
वर्धा जिल्ह्याच्या कारंजा घाडगे येथील गवंडी मार्गांवर जेवणानंतर इव्हनिंग वॉक करण्यासाठी गेले. यावेळी दाम्पत्याला वनविभागाच्या वाहनाने धडक दिलीय. या धडकेत शिक्षकाचा मृत्यू झाला असून पत्नी थोडक्यात बचावली आहे. कारंजा येथील शिक्षक भोजराज गाखरे आणी त्यांच्या पत्नी उषा गाखरे हे रात्री जेवण केल्यावर फिरायला गेले. गवंडी मार्गांवर फिरत असतांना मागून भरधाव वेगात येणाऱ्या वनविभागाच्या वाहनाने जोरदार धडक दिली.
चालक सरेंडर
ही धडक इतकी भीषण होती की वाहनाने धडक दिल्यावर शिक्षक रस्त्याच्या कडेला घुसला. वनविभागाच्या वाहनावर असलेल्या चालक हा मद्यप्राशन करून वाहन चालवत होता, असा आरोप करण्यात आला आहे. दाम्पत्याला चिरडल्यानंतर वाहन चालकाने पळून जात कारंजा पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं.
या भीषण अपघातामध्ये भोजराज गाखरे यांचा मृत्यू झाला असून पत्नी उषा गाखरे या थोडक्यात बचावल्या. चांगलं व्यक्तिमत्व असलेल्या शिक्षकाचा दुर्घटनेत मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जातेय.