Yavatmal Crime : मित्रच मित्राच्या जीवावर उठला! पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा का केला प्रयत्न?
मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना! आकाशच्या अंगावर संदीपने पेट्रोल टाकून पेटवून दिलं कारण...
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. एका मित्राने मित्राचीच हत्या करण्याचा प्रयत्न केला. मित्राने आपल्या मित्रावर पेट्रोल टाकलं आणि त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. ही घटना कळंब तालुक्यातील शंकरपूर इथं घडली. या घटनेत मित्र 50 टक्के भाजला असून त्याच्यावर रुग्णलायत उपचार सुरु आहेत. ज्या कारणासाठी मित्राने आपल्याच मित्राला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, ते कारणही हादरवून टाकणारं आहे.
संदीप वंजारी आणि आकाश भोयर हे एकमेकांचे मित्र. संदीपने आकाशला दारु पाजली. त्यानंतर गाडीतील पेट्रोल काढलं आणि ते आकाशच्या अंगावर फेकून दिलं. यानंतर आकाशला संदीपने पेटवूनही दिलं. या घटने आकाश भोयर हा 50 टक्के भाजला गेलाय. सध्या त्याची मृत्यूशी झुंज सुरु आहे. त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
का जिवंत जाळण्याचा प्रयत्न?
आकाश याने एका वर्षापूर्वी संदीपकडून 10 हजार रुपये घेतले होते. उसने पैसे परत मिळावेत यासाठी संदीप वेळोवेळी आकाशकडे मागणी करत होता. पण आकाशने 10 हजार रुपयांची परतफेड केली नव्हती.
आकाश उसने पैसे का परत करत नाही याची विचारणा करण्यासाठी संदीपने आकाशला शेत शिवाराजवळ बोलावून घेतलं. त्याला दारुदेखील पाजली. यानंतर संदीपने आधीच ठरवल्याप्रमाणे आकाशच्या अंगावर गाडीतील पेट्रोल काढून ओतलं आणि त्याला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला.
10 हजार रुपयांसाठी मित्रच मित्राच्या जीवावर उठल्याची घटना समोर आल्यानं यवतमाळ हादरुन गेलंय. कळंब तालुक्यात या घटनेनं खळबळ माजली आहे. आरोपी मित्र संदीप वंजारी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी कळंब पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.