SBI चौकात बेछूट गोळीबार, 29 वर्षीय गुंडाची हत्या, हॉटेलचालक जखमी
करण परोपटे (रा. राणी अमरावती ता. बाभुळगाव) असे 29 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. तो अक्षय राठोड टोळीचा सदस्य होता. तो रेती तस्करीही करत असल्याची माहिती आहे.
यवतमाळ : बेछूट गोळीबार करुन 29 वर्षीय तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमधून समोर आला आहे. जुन्या वादातून चार ते पाच जणांनी तरुणावर हल्ला केला. गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. ही घटना यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौक परिसरात बुधवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. (Yawatmal Goon Karan Paropate Murder)
करण परोपटे (रा. राणी अमरावती ता. बाभुळगाव) असे 29 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. तो अक्षय राठोड टोळीचा सदस्य होता. तो रेती तस्करीही करत असल्याची माहिती आहे. शहरात भरचौकात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
काय घडलं नेमकं?
बाभुळगाव तालुक्यातील राणी अमरावती येथे राहणारा गुन्हेगारी वृत्तीचा करण परोपटे हा काही कामानिमित्त बुधवारी यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौकात आला होता. यावेळी तो एका हॉटेलसमोर उभा असताना रात्री 9 वाजताच्या सुमारास चार ते पाच तरुणांनी अचानक येऊन करणवर बेछूट गोळीबार केला.
उपचारादरम्यान मृत्यू
या गोळीबारमध्ये करण परोपटे आणि हॉटेल चालक गुप्ता गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन जखमींना तातडीने यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. यात उपचारादरम्यान करण परोपटे याचा मृत्यू झाला.
करण परोपटे खून प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरुन एक जिवंत काडतुस, तीन रिकाम्या केस (काडतुसे) आणि एक धारदार चाकू आदी साहित्य जप्त केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
शहरात गँगवार होण्याची शक्यता
करण परोपटे हा कुख्यात गुंड आणि सध्या एमपीडीए अंतर्गत कारागृहात असलेल्या अक्षय राठोडच्या टोळीचा सदस्य होता. काही दिवसांपूर्वी यवतमाळ शहरातील चांदोरे नगरात करण आणि अक्षय टोळीतील एका सदस्यासोबत एक वाद झाला होता. याबाबत यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला होता. त्याच कारणावरुन हा गोळीबार झाला असावा, असा अंदाज पोलीस सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
नाशिकमधील वृद्ध शेतकरी हत्या प्रकरण, झारखंडमधून संशयिताच्या मुसक्या आवळल्या
राजावाडी रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडलेल्या 24 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
(Yawatmal Goon Karan Paropate Murder)