Bhandara Crime : अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला चिरडलं, घटनेत तलाठी गंभीर जखमी
भंडाऱ्यात अवैध वाळू उत्खननाचा प्रश्न जटिल बनला आहे. वाळू उत्खनन रोखण्याचे मोठे आव्हान आहे. चोरुन वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करायला जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत.
भंडारा / 12 ऑगस्ट 2023 : वाळूची अवैध वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या भरारी पथकावर हल्ला झाल्याची घटना भंडाऱ्यात घडली आहे. केवळ हल्लाच केला नाही, तर नायब तहसिलदाराला ट्रॅक्टरखाली चिरडण्यात आले. यात नायब तहसिलदार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. किरण मोरे 35 वर्षीय जखमी नायब तहसिलदाराचे नाव आहे. भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील खातखेडा येथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पवनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टर मालक आणि ट्रॅक्टर चालक दोघेही फरार आहेत. पोलीस आरोपींचा कसून शोध घेता आहेत.
नायब तहसिलदारांच्या अंगावर थेट ट्रॅ्क्टरच घातला
पवनी तालुक्यातील खातखेडा येथे अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरु होती. याची माहिती मिळताच पवनी तहसील कार्यालयाचे एक नायब तहसीलदार आणि दोन तलाठ्यांचं एक भरारी पथक कारवाई करण्यासाठी खातखेडा येथे रात्रीच्या सुमारास गेले होते. यावेळी ट्रॅक्टर चालक आणि मालकानं कारवाई करायला आलेल्या भरारी पथकावर हल्ला केला. एवढ्यावरच न थांबता नायब तहसिलदाराला ट्रॅक्टरखाली चिरडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
जखमी नायब तहसिलदारावर रुग्णालयात उपचार सुरु
या घटनेत गंभीर जखमी नायब तहसिलदारांना उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. पंकज काटेखाये आणि आशिष काटेखाये अशी फरार आरोपींची नावे आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोपी सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले करत आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.