Nanded | बिल्डर Sanjay Biyani हत्याकांड, खा. प्रतापराव चिखलीकरांची गृहमंत्री अमित शहांशी भेट, 3 दिवसात तपास कुठवर?
संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलीसांनी विशेष पथके स्थापन केली असून नांदेडबाहेरील जिल्ह्यातही काही पथके रवाना झाली आहेत. घटनास्थळ आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
नांदेड | नांदेडमधील प्रसिद्ध बिल्डर व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांची हत्या होऊन तीन दिवस उलटले असून या हत्याकांडामुळे अवघ्या नांदेडमध्ये (Nanded) तणावपूर्ण शांतता आहे. बियाणी यांच्या मारेकऱ्यांचा आणि हत्या नेमकी कोणत्या कारणास्तव झाली, याचा शोध अद्याप लागलेला नाही. या तपासात काही ठोस क्लू मिळतोय, का याची शोधाशोध सुरु आहे. घटनास्थळ आणि परिसरातील सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज खंगाळून काढले जात आहेत. बियाणी यांच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर पकडा आणि त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी अधिक तीव्र होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेतल नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबईत राज्याच्या गृहमंत्र्यांची भेट घेतली तर खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेऊन हा तपास उच्चस्तरीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून करण्याची विनंती केली. 5 एप्रिल रोजी भरदिवसा सकाळी अकरा वाजता त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या झाडण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
कोण होते संजय बियाणी, हत्या कधी झाली?
नांदेड शहराच्या विकासात आणि वैभवात भर घालणारा एक उत्तम बांधकाम उद्योजक माहेश्वरी समाजातील तरुण समाजसेवक यासोबतच समाजशील व्यक्तिमत्व म्हणून संजय बियाणी यांची ख्याती होती. अल्पावधीत त्यानी बांधकाम क्षेत्रात घेतलेली भरारी अतुलनीय होती. सामाजिक क्षेत्रातले त्यांचे काम तितकेच मोठे होते. माहेश्वरी समाजातील गोरगरीब कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी त्यांनी विशेष योजना राबवत अल्पदरामध्ये घरे दिली होती. त्यामुळे संजय बियाणी यांचे सामाजिक आणि बांधकाम या क्षेत्रातील योगदान अतुलनीय होते. मात्र दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी अज्ञात मारेकर्यांनी बियाणी यांच्या घरासमोर त्यांना गोळ्या झाडून हात्या केली. बियाणी यांना काही वर्षांपूर्वी खंडणीसाठी धमक्यांचे सत्र सुरु होते. तेव्हापासून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. मात्र तीन महिन्यांपूर्वीच त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. त्यामुळे खंडणीखोरांनीच त्यांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
केंद्रीय तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती
दरम्यान, काल संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तातडीने दिल्ली गाटत केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन या हत्याकांडाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेच्या मार्फत करावा, बियाणी कुटुंबीयांना न्याय द्यावा ,मारेकऱ्यांना आणि त्याच्या सूत्रधारास तात्काळ अटक करावी अशी मागणी केली.याचवेळी महेश्वरी समाजाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले होते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी माहेश्वरी समाजाच्या मागण्याचे ते निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कार्यालयात दिले. दरम्यान, नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबईत राज्याच्या गृहमंत्र्यांची भेट घेतली. तसेच बियाणी यांच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक करण्याची विनंती केली.
हत्याकांडाचा तपास कुठवर?
संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलीसांनी विशेष पथके स्थापन केली असून नांदेडबाहेरील जिल्ह्यातही काही पथके रवाना झाली आहेत. घटनास्थळ आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. टॉवर लोकेशनवरून त्यावेळी तेथे ऑपरेट झालेल्या मोबाइल क्रमांकाची माहितीही मिळवली गेली असून या तांत्रिक माहितीचे लवकरच विश्लेषण केले जाणार आहे. या खून प्रकरणात दोन साक्षीदार असून एक त्यांच्या वाहनाचा चालक असून तो घटनेच्या वेळी मारेकऱ्यांना पाहून स्टेअरिंगखाली लपला होता. तर घराचे गेट उघडायला आलेला दुसरा चालक, जो या गोळीबारात गंभीर जखमी झाला, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हे या घटनेतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. घटनास्थळी आणखीही काहीजण उपस्थित होते, त्यांचीही साक्ष नोंदवली जाणार आहे.
इतर बातम्या-