Nashik accident | कर्मचाऱ्याच्या अंगावर गरम डांबराचा ट्रक उलटला; नाशिकमध्ये भीषण अपघात
नाशिक महामार्गावरील सर्व्हीस रोडवर एक अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) अक्षरशः काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडलीय. गरम डांबराची वाहतूक करणारा ट्रक (truck) एका कर्मचाऱ्याच्या अंगावर उलटलाय. त्यामुळे कर्मचारी गंभीर भाजला असून, त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिकमधील एम. जी. रोड परिसरात ही दुर्घटना घडली. या भागात गॅस पाईपलाईनसाठी रस्त्याच्या बाजूला खड्डे खणण्यात आले होते. हे खड्डे बुझवण्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला. रस्त्यावरील खड्डे व्यवस्थित बुझवण्यात आले नाहीत. त्याच खड्ड्यात ट्रकचा चाक रुतला. त्यामुळे गरम डांबर भरलेला ट्रक कर्मचाऱ्याच्या अंगावर उलटल्याचे समजते. या घटनेत कर्मचारी प्रचंड भाजला असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताची बातमी परिसरात पसरली. त्यामुळे घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती.
दुचाकीस्वार ठार
नाशिक महामार्गावरील सर्व्हीस रोडवर एक अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. राणोबा कुवर असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल पंडित गुंजाळ (वय 25 रा. विंचुरगवळी, जि. नाशिक) हे आपले मेहुणे राणोबा कुवर यांच्यासोबत दुचाकीवरून हनुमाननगर येथून जत्रा हॉटेलकडे निघाले होते. मात्र, लोकमान्य हॉस्पिटलच्या भागात पाठीमागून आलेल्या भरधाव चारचाकीने त्यांच्या दुचाकीस उडवले. यात दोघेहे जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचार सुरू असताना कुवर यांचा मृत्यू झाला.
अपघात वाढले
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट, नो पट्रोल मोहीम सुरू केली. त्यानंतर दुचाकीस्वारांचे समुपदेशन सुरू केले. त्यांची परीक्षाही घेण्यात आली. त्यानंतरही दुचाकीचालक हेल्मेट घालत नाहीत. त्यामुळे आता दंड वाढवण्यात आला असून, वाहतूक परवाना रद्द करू असा इशाराही देण्यात आलाय.
इतर बातम्याः
Lata Mangeshkar | अवघ्या 13व्या वर्षी पहिलं रेकॉर्डिंग! असा होता 80 वर्षांचा म्युझिकल प्रवास
Lata Mangeshkar | निर्विवाद तजेलदार! आईसाठी तर आवाज दिलाच, पण लेकीसाठीही लतादीदींनी गाणी गायली