Wildlife Smuggling | 3 स्टार बॅक कासव, 2 पंचम बेडूक, 4 हेजहॉगसह 30 दुर्मिळ वन्यजीवांची तस्करी, वनविभागाने दाखवला इंगा…!
नाशिक जिल्हा हा वनसंपदा आणि प्राणीसंपदेबाबत समृद्ध मानला जातो. याचाच लाभ घेत अनेक तस्कर येथे मोकाट सुटलेत. बरेच जण वनसंपदेवर डल्ला मारतात. तर काही जण दुर्मिळ प्राण्यांची तस्करी करून त्यांची लाखो रुपयांमध्ये विक्री करतात.
नाशिकः आपण नाव मोठे, लक्षण खोटे ही म्हण कितीदा तरी ऐकली असेल. त्याचाच प्रत्यय नाशिकमध्ये (Nashik) आलाय. द्वारका परिसरातील स्टार अक्वेरियम या दुकानात टाकलेल्या छाप्यात वनविभागाला (Forest Department) एका दुर्मिळ कासवासह 30 वन्यजीव आढळले आहेत. याप्रकरणी संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, कोर्टाने त्यांची 10 फेब्रुवारीपर्यंत कोठडीत रवानगी केलीय. वसीम चिरागोद्दीन शेख, फारुख चिरागोद्दीन शेख अशी आरोपींची नावे आहेत. यात आंतरराज्य टोळीचा समावेश आहे का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, संशयितांच्या चौकशीतून इतरही माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात प्राण्यांची तस्करी कुठे आणि कशासाठी सुरू होती, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
काय सापडले छाप्यात?
द्वारका परिसरातील वृदांवन कॉलनीतील स्टार अक्वेरियम येथे दुर्मिळ वन्यजीवांची विक्री सुरू आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यावरून उप वनसंरक्षक पंकज गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी एम. बी. पाटील यांनी स्टार अक्वेरियम या दुकानात छापा मारला. तेव्हा त्यांना तलावातील कासव, नदीत आढळणारे कासव, 3 स्टार बॅक कासव, 2 पंचम बेडूक, 4 हेजहॉग, 1 रिंग नेक पॅराकीट, 15 अॅलेक्सडिम पॅराकीट विक्रीसाठी आणल्याचे आढळून आहे. त्यांनी या प्राण्यांसह दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या.
नाशिक समृद्ध जिल्हा
नाशिक जिल्हा हा वनसंपदा आणि प्राणीसंपदेबाबत समृद्ध मानला जातो. याचाच लाभ घेत अनेक तस्कर येथे मोकाट सुटलेत. बरेच जण वनसंपदेवर डल्ला मारतात. तर काही जण दुर्मिळ प्राण्यांची तस्करी करून त्यांची लाखो रुपयांमध्ये विक्री करतात. या तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. नाशिकच्या द्वारकाभागामध्ये या तस्करांनी प्राणी आणल्याचे पाहून वनविभागही चक्रावून गेलाय. त्यांनी याप्रकरणाची पाळेमुळे खणायला सुरुवात केली असून, यात एखाद्या आंतरराज्यीय टोळीचा हात आहे का, हे तपासून पाहिले जात आहे. शिवाय या वन्यजीवांची विक्री कोठे आणि कोणाला होणार होती, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
यांची सुरू होती तस्करी
– तलावातील कासव
– नदीत आढळणारे कासव
– 3 स्टार बॅक कासव
– 2 पंचम बेडूक
– 4 हेजहॉग
– 1 रिंग नेक पॅराकीट
– 15 अॅलेक्सडिम पॅराकीट
इतर बातम्याः
Lata Mangeshkar | अवघ्या 13व्या वर्षी पहिलं रेकॉर्डिंग! असा होता 80 वर्षांचा म्युझिकल प्रवास
Lata Mangeshkar | निर्विवाद तजेलदार! आईसाठी तर आवाज दिलाच, पण लेकीसाठीही लतादीदींनी गाणी गायली