Nashik Crime | नाशिकमध्ये महिनाभरापूर्वी प्राणप्रतिष्ठा केलेले मंदिर फोडले; दीड किलोची मूर्ती लंपास
नाशिकचा प्रवास नेमका कुठे सुरू आहे, असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे. इतक्या वेगाने होणारे गुन्हेगारीकरण सर्वांनाच चिंतेत टाकणारे आहे.
नाशिकः नाशिकमध्ये सतत सुरू असलेल्या चोरीच्या घटना काही केल्या थांबायला तयार नाहीत. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. आता उत्तमनगरमध्ये अवघ्या महिनाभरापूर्वी प्राणप्रतिष्ठा केलेले मंदिर फोडून चोरट्यांनी दीड किलोची मूर्ती लंपास केली आहे. त्यामुळे भक्तांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्त जयंती उत्साहात
नाशिकमधील उत्तरनगरात महिनाभरापूर्वी श्री गुरुदेव दत्ताचे मंदिर साकारण्यात आले आहे. भक्तांनी पितळेच्या धातूपासून घडविलेली गुरुदेव दत्तांची विलोभनीय मूर्ती आणली. चौकातील झाडाखाली मोठ्या आस्थेने या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. येथे काही दिवसांपूर्वी दत्त जयंतीचा सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा होऊन अजून धड एक महिनाही पूर्ण होत आला नाही. तो चोरट्यांनी मंदिर फोडून मूर्ती लंपास केल्याने भक्तांमध्ये संतापाचे वातावरण आहे. घर नाही तर नाही, चक्क लहान-लहान मंदिरेही सुरक्षित नसल्याबद्दल ते रोष व्यक्त करत आहेत.
पोलिसांसमोर आव्हान
चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर भक्त परिवाराने अंबड पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली आहे. तक्रारीत मूर्तीचे वर्णन केले आहे. लवकरात लवकर या चोरीचा छडा लावून चोरट्यांना बेड्या ठोकाव्यात अशी मागणी केली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी दिली आहे. दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्येही धास्ती आहे.
नेमके चाललेय तरी काय?
नाशिकमध्ये नेमके चाललेय तरी काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी एकाच आठवड्यात तीन खून झाले. त्यात एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला संपवले. हा प्रश्न विधिमंडळातही गाजला. त्यानंतर काही दिवसात एकाच आठवड्यात तीन दरोडे पडले. चोरीच्या घटना तर सुरूच असतात. त्यामुळे नाशिकचा प्रवास नेमका कुठे सुरू आहे, असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे. इतक्या वेगाने होणारे गुन्हेगारीकरण सर्वांनाच चिंतेत टाकणारे आहे. दरम्यान, या चोरीप्रकरणी पोलिसांनी लवकरात लवकर तपास करून चोरट्यांना बेड्या ठोकाव्यात अशी मागणी भक्तांनी केली आहे.
इतर बातम्याः
Nashik | लोकशाहीवरील अढळ निष्ठेसाठी विविध कार्यक्रम, जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्व संस्थांना सूचना काय?