Nashik Accident | ऊसतोड कामगारांना नेणारा आयशर ट्रक नाशकात पलटी, 30 हून अधिक जखमी, तिघे गंभीर
नाशिकमधील नांदगावात आयशर ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत, तर 30 हून अधिक ऊसतोड कामगार किरकोळ जखमी झाले आहेत
मालेगाव : ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात (Truck Accident) झाला. आयशर ट्रक पलटी झाल्याने (Eicher Truck Overturn) झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर 30 हून अधिक ऊसतोड कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील (Nashik Nandgaon Accident) डॉक्टरवाडी शिवारात काल रात्री घडली. अपघातग्रस्तांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
नेमकं काय घडलं?
भिमाशंकर येथील कारखान्यावरुन ऊस तोडणीचे काम करून हे कामगार आपल्या चाळीसगाव तालुक्यातील बोढरे तांडा येथील आपल्या घरी परतत होते. नांदगाव – चाळीसगाव रस्त्यावरील डॉक्टरवाडी शिवारात आयशर ट्रक पलटी झाल्याने हा अपघात घडला.
30 हून अधिक ऊसतोड कामगार जखमी
आयशर ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत, तर 30 हून अधिक ऊसतोड कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका तसेच पोलिसांच्या वाहनातून जखमींना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातग्रस्तांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
अपघातातील जखमींवर उपचार
जखमींवर तातडीने नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी मालेगाव, चाळीसगाव येथे पाठवण्यात आले. जखमींची संख्या जास्त असल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांसह परिसरातील इतरही खाजगी डॉक्टरांनी देखील यावेळी अपघातातील जखमींवर उपचार करत मदतीचे दर्शन घडवले.