दरोडेखोराचा फिल्मी स्टाईल पाठलाग, जखमी होऊनही पोलिसाने गचांडी धरलीच, कसारा घाटात थरारनाट्य
पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास ट्रकजवळ पल्सर बाईकवर तिघे जण आले. पूर्ण काळे कपडे परिधान केलेल्या या तिघा तरुणांनी गाडीतील चालकास आवाज देत उठवलं. दादागिरी करत ट्रकवर दगडफेक केली
इगतपुरी : पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास कसारा घाटात (Kasara Ghat) बंद पडलेल्या ट्रकच्या चालकाला मारहाण करुन लूट करण्यात आली. अर्धा तासाच्या थरार नाट्यानंतर एका दरोडेखोराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या झटापटीत एक जिगरबाज पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. तिघा दरोडेखोरांपैकी (Robbery) मुख्य सूत्रधार असलेल्या विजय रामदास ढमाळे याला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले. पोलीस हवालदार मुरलीधर गायकवाड यांनी त्याला पकडून ठेवले होते. त्यामुळे ढमाळेने गायकवाडांवर धारदार हत्याराने हल्ला चढवला. त्यात ते जखमी झाले. मात्र अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद केले आणि कसारा पोलिसांच्या ताब्यात (Nashik Crime) दिले.
काय आहे प्रकरण?
नाशिक दिशेहून मुंबईकडे लोखंडी प्लेट घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम एच 40 बी जी 6165 बंद पडला होता. रात्रीच्या सुमारास नवीन कसारा घाट उतरत असताना गाडीचा पाटा तुटल्यामुळे महामार्ग पोलिसांच्या मदतीने चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला लावून ठेवला होता. रात्रीच्या वेळी गॅरेज उपलब्ध होत असल्याने महामार्ग पोलिसांनी ट्रक चालकाला मोबाईल नंबर दिला आणि ते गस्तीसाठी निघून गेले.
नेमकं काय घडलं?
पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास ट्रकजवळ पल्सर बाईकवर तिघे जण आले. पूर्ण काळे कपडे परिधान केलेल्या या तिघा तरुणांनी गाडीतील चालकास आवाज देत उठवलं. दादागिरी करत ट्रकवर दगडफेक केली. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत महामार्ग पोलिसांना कॉल केला. मात्र तोपर्यंत तिघा दरोडेखोरांनी ट्रकमध्ये चढून ट्रक चालक विकी खोब्रागडे आणि क्लिनर निधी वासनिक यांना बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून घेतले.
त्याच दरम्यान महामार्ग पोलीस घोटी केंद्राचे माधव पवार, मुरलीधर गायकवाड, दीपक दिंडे आणि संजय नंदन हे तिथे पोहोचले. पोलीस आल्याचे समजताच लुटारुंनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जंगलात पळ काढला.
फिल्मी स्टाईल पाठलाग
तिघा दरोडेखोरांपैकी मुख्य सूत्रधार असलेल्या विजय रामदास ढमाळे (रा. इगतपुरी) याला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले. पोलीस हवालदार मुरलीधर गायकवाड यांनी त्याला पकडून ठेवले. त्यामुळे ढमाळे याने गायकवाड यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला चढवला. त्यात ते जखमी झाले. त्याच दरम्यान अन्य कर्मचाऱ्यांनी जेरबंद करत त्याला ताब्यात घेतले आणि कसारा पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपींकडे असलेली दुचाकी MH 15 HB 1075 देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
पहाटेच्या अंधारात थरारनाट्य
दरम्यान कसारा घाटात धारदार शस्त्र घेऊन लूटमार करणारी टोळी वाहन चालकांवर दादागिरी आणि मारहाण करत असून महामार्ग पोलिसांवर सुद्धा दगडफेक करत असल्याची माहिती मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे पीएसआय सलमान खतीब, पोलीस कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन टीम, रूट पेट्रोलिंग टीमचे सदस्य मदतीला पोहोचले. परंतु तोपर्यंत दोघे जण पळून गेले, तर एका आरोपीला महामार्ग पोलिसांनी पकडून ठेवले होते. मात्र पहाटेच्या अंधारात घडलेल्या अर्ध्या तासाच्या या थरारनाट्यात शस्त्रधारी दरोडेखोरांशी दोन हात करणाऱ्या महामार्ग पोलिस व कसारा पोलिसांचे कौतुक होत आहे.
संबंधित बातम्या :
शस्त्राचा धाक दाखवून सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधील प्रवाशाला लुटले, अडीच लाखाचा ऐवज लुटला
अजिंठा पर्यटक केंद्रात दरोडेखोरांचा सात तास थरार, ट्रान्सफॉर्मर फोडून ऑइल, कॉपरची चोरी!
चार राज्यांचे पोलीस मागावर, 32 गुन्हे दाखल, देवदर्शनाला आला आणि सराईत दरोडेखोर जाळ्यात