Nashik Attack : माथेफिरू गुंडाचा आरपीएफ अधिकाऱ्यावर चाकूहल्ला; अधिकारी गंभीर जखमी, तरुणाला अटक
माथेफिरू गुंडाच्या हल्ल्यात आरपीएफ अधिकारी तिवारी हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस ठाण्यातच रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस अधिकाऱ्यासोबत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
नाशिक : जिल्ह्यातील नांदगाव रेल्वे स्थानकाजवळ एका माथेफिरू गुंडाने रेल्वे पोलीस बलातील (RPF)) वरिष्ठ अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला (Knife Attack) केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी या तरुणाला अटक (Arrest) करून गुन्हा दाखल केला आहे. सुकेश तिरडे असे हल्ला करणाऱ्या संशयित तरुणाचे नाव असून त्याच्यावर हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. सुरक्षा रक्षकावरच हल्ला करण्याचा अतिरेक गुंडाने केल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसह स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डी. के तिवारी असे हल्ला झालेल्या आरपीएफ अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी मालेगावच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. नांदगाव रेल्वे स्थानकात माथेफिरू गुंड सुकेश तिरडे हा प्रवाशांना दमदाटी देत होता. यावेळी आरपीएफच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी सुरु केले. त्याला चौकशीसाठी आरपीएफच्या कार्यालयात आणले गेले होते. याचदरम्यान तिरडी याने अचानक आरपीएफ अधिकारी तिवारी यांच्यावर चाकूने हल्ला केला. विशेष म्हणजे अधिकाऱ्यावर हल्ला केल्यानंतर त्याने स्वतःवर देखील वार करून घेतला. तो गोंदिया येथील राहणारा असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ल्याच्या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
पोलीस ठाण्यातच झालेल्या हल्ल्यामुळे प्रचंड खळबळ
माथेफिरू गुंडाच्या हल्ल्यात आरपीएफ अधिकारी तिवारी हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस ठाण्यातच रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस अधिकाऱ्यासोबत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. आरपीएफचे सर्व अधिकारी कामावर रुजू झाल्यानंतर तिवारी फेरफटका मारत होते. यावेळी त्यांना तिरडे हा माथेफिरू गुंड रेल्वे स्थानकावर संशयास्पद कृत्य करताना दिसला. त्यावेळी तिवारी यांनी सावधगिरी बाळगत त्या तरुणाचा माग काढला आणि त्याला ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर तिवारी त्याला पोलिस ठाण्यात घेऊन आले. त्याचा राग मनात धरून तिरडे याने तिवारी यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर स्वतःच्या मानेवर व पोटावर चाकूने वार केले. संशयित तरुण रेल्वे स्थानकावर फिरत असल्याने त्याची चौकशी केली असता संतप्त झाल्याने त्याने हल्ला केला असावा, असा प्राथमिक अंदाज रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. (RPF officer seriously injured in a knife attack by a goon in Nashik)