रोलेट ‘किंग’वर अखेर गुन्हा दाखल, 27 लाखांची फसवणूक कशी केली? ऐकून पोलिसांनाही बसला धक्का
नाशिकच्या ओझर पोलिसांनी रोलेट किंगसह सात जणांवर गुन्हा दाखल केल्याने ऑनलाईन जुगार क्षेत्रात खळबळ उडाली असून पोलिसांच्या कारवाईकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
नाशिक : गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन जुगार खेळणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामध्ये ऑनलाइन जुगार खेळणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतात संशयित आरोपी हे जामीनावर सुटून ते पुन्हा ऑनलाईन जुगार सुरूच ठेवत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये आँनलाईन सायबर बिंगो म्हणजेच रोलेट ह्या गेमच्या माध्यमातून मोठा धुमाकूळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. हा गेम खेळत असतांना काही जणांनी पैसे उकळविण्यासाठी केलेला प्रकार धक्कादायक असल्याचे समोर आले आहे. तक्रारदाराने याबाबत ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ऑनलाइन जुगार खेळणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
रोलेट खेळत असतांना दुप्पट पैशाचे आमिष दाखवून सात संशयित आरोपींनी एकाची 27 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. ओझर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर ही बाब समोर आली आहे.
खरंतर हा फसवणुकीचा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. यामध्ये ओझर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार 2011 पासून ते मागील महिन्यांपर्यंत म्हणजेच फेब्रुवारी 2013 या दरम्यानच्या काळात फसवणूक झाली आहे.
तक्रारदाराच्या तक्रारीवरुन मुंबईतील अचल चौरसिया, रमेश चौरसिया, नाशिकमधील कैलास शहा, कुमार जाधव, अमोल कदम, दीपक सोनवणे, वैभव बच्छाव यांनी ही जवळपास 28 लाखांची फसवणूक केली आहे.
सध्या ऑनलाईन सायबर बिंगो हा जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे. त्यातच जे पैसे हारलेले असतात त्यांना गाठून दुप्पट पैसे होण्याची संधी असल्याचे सांगत पैसे गुंतवणूक करण्यास सांगतात. मात्र त्यात पैसे मिळत नसल्याने अनेक जन विचारणा करतात. त्यावरून वाद आणि धमकी दिली जात असल्याचे समोर आले आहे.
असाच प्रकार रामदास अर्जुन नेहरे यांच्यासोबत घडल्याने त्यांनी ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये त्यांनाही संशयित आरोपींच्यापैकी काहींनी भेटून आमिष दाखविले होते. त्यावरून नंतर हे प्रकरण धमकी पर्यन्त गेल्यानंतर पोलिस ठाण्यात पोहचेल आहे.
या प्रकरणानंतर पोलिसांच्या तपासात मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता असून पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहे. त्यानुसार रोलेट किंग म्हणून ओळख असलेल्या कैलास शहावर गुन्हा दाखल झाल्याने जोरदार चर्चा होत आहे.