तिकीटाच्या नादात चुना लावला, पैशासाठी महिनाभर प्रयत्न केले; नंतर सायबर पोलिसांनी आणले वठणीवर, पाहा कसे?
ऑनलाईन तिकीट काढत असतांना दहा हजार रुपयांना गंडा बसला होता. महिनाभर प्रयत्न करूनही पैसे परत मिळत नव्हते. मात्र, सायबर पोलिसांनी काही तासांमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
नाशिक : अनेकदा ऑनलाइन व्यवहार करत असताना किंवा इंटरनेटचा वापर करत असतांना अनेकांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना घडल्याचं समोर आले आहे. ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर अनेकदा पैसे मिळत नाहीत अशीच अनेकांची धारणा असते त्याचं कारण म्हणजे अनेकांना आलेला सायबर पोलिसांचा अनुभव. याला अपवाद ठरत आहे ते नाशिकचे सायबर पोलीस. गेल्या महिन्यात नाशिक मधून एकाला दिल्लीसाठी विमानाने जायचे असताना त्यांने एका ऑनलाइन वेबसाईटच्या माध्यमातून तिकीट बुकिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिकीट कन्फर्म झालेच नाही मात्र हजारो रुपयांना गंडा बसला होता.
वारंवार संबंधित व्यक्तीने कंपनीला मेलद्वारे आणि फोनच्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. महिना उलटून गेला मात्र कुठलाच प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे फसवणूक झाल्याची खात्री झाली.
फसवणूक झाल्याची बाब निदर्शनास येण्यापूर्वी संबंधित व्यक्तीने बँकेतही याबाबत विचारणा केली. त्यामध्ये आणखी एक बाब म्हणजे विमान कंपनीशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
मात्र, यामध्ये कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने आणि दहा हजार रुपये परत मिळतील याची शास्वती जवळपास निश्चित नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून सायबर पोलिस ठाणे गाठले. यामध्ये सायबर पोलिसांनी संपूर्ण घटना जाणून घेत तपास सुरू केला.
काही तासांमध्ये पोलिसांनी संपर्क साधून विचारणा केली. त्यानंतर लागलीच संबंधित व्यक्तीच्या खात्यावर पैसे प्राप्त झाले. त्यानंतर आपल्या खात्यावरून गेलेले पैसे परत आल्याची खात्री केल्यानंतर तक्रारदार व्यक्तीने सायबर पोलिस ठाणे गाठून सायबर पोलिसांचे आभार मानले.
इंदिरानगर येथील राजेश कुलकर्णी यांची फेब्रुवारी महिण्यात फसवणूक झाली होती. पोलिसांनी 3 एप्रिलला पैसे परत मिळून दिले आहे. यामध्ये सायबरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्यासह पोलीस नाईक संतोष गोसावी आणि महिला अंमलदार सरला गवळी यांनी ही कारवाई केली आहे.