पोलिस अधिकाऱ्याला Dating App चा छंद, सायबर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन भिंग फुटलं, कुणी घातला गंडा ?
नाशिक शहरातील पोलिस दलात सध्या एका तक्रारीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. ही तक्रार स्वतः एका पोलिस निरीक्षक पदावर असलेल्या व्यक्तीने ही तक्रार केली आहे.
नाशिक : नाशिकच्या सायबर पोलिस ठाण्यात एका पोलिस निरीक्षकानेच सकाळी सकाळी धाव घेत तक्रार दिल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकाऱ्याला तब्बल दोन लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे ही रक्कम काढण्यामागील प्रकरण संपूर्ण पोलिस दलात चर्चेचा विषय ठरत आहे. डेटिंग अॅप अनइंस्टॉल केल्यानंतर पुन्हा इन्स्टॉल करतांना पासवर्ड विसरल्यानं हा सगळा प्रकार घडला आहे. गुगलवर जाऊन कस्टमर केअरचा नंबर घेऊन फोन करून मदत घेणं पोलिस निरीक्षकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. सायबर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिल्याने हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे.
नाशिक पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका पोलिस निरीक्षकाने सायबर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. यामध्ये त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांची दोन लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
तक्रारदार पोलिस निरीक्षक यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये डेटिंग अॅप इन्स्टॉल केले होते. त्याचा वापर करत होते. मात्र, एकदा त्यांनी अनइन्स्टॉल केले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा ते इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न केला. आणि तिथे त्यांना लॉगिन करतांना अडचण येऊ लागली.
आय डी आणि पासवर्ड विसरल्याने त्यांनी लॉगिन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये त्यांना वारंवार अपयश येत असल्याने त्यांनी शक्कल लढवली. कस्टमर केअरचा नंबर गुगलवरुन घेत संपर्क केला आणि मदत मागितली.
समोरील व्यक्तीने रिमोट घेणाऱ्या अॅपच्या माध्यमातून मोबाईलचा पूर्ण ताबा घेतला. आणि त्याच वेळी त्यांना पाच रुपयांचा ऑनलाईन व्यवहार करण्यास सांगितले. आणि त्यांनी त्यावेळेला ऑनलाइन असलेल्या भामट्याने संपूर्ण प्रोसेस बघून घेतली.
सर्व माहिती घेऊन ऑनलाइन भामटयांनी अवघ्या दोन तासात दोन लाखांची रक्कम काढून घेतली. त्यानंतर तक्रारदार पोलिस निरीक्षकाला पैसे कट झाल्याचा मेसेज मिळाला आणि त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या संपूर्ण प्रकरणानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि फिर्याद दिली. त्यानंतर मात्र संपूर्ण पोलिस दलात या डेटिंग अॅप प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे. विशेष बाब म्हणजे एका पोलिस अधिकाऱ्याची फसवणूक झाल्याने या फसवणुकीची जोरदार चर्चा होत आहे.