रस्त्यात गाठतात, धाक दाखवतात, अनेक घटना, एकसारखा पॅटर्न, मालेगावात पोलिसांचं टेंशन वाढलं, काय घडतंय?
तब्बल सव्वा पाच लाख रुपये पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाकडून लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.
मालेगाव ( नाशिक ) : गेल्या काही महिन्यांपासून मालेगाव शहर आणि शहराच्या लगत असलेल्या गावांमध्ये काही विशिष्ट पद्धतीच्या चोऱ्या समोर आलेल्या आहेत. त्या चोरीच्या घटना बघता काही चोरटे फक्त पैसे घेऊन प्रवास करणाऱ्यांनाच लक्ष करत असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये चार चाकी असू द्यात किंवा दुचाकी या प्रत्येकाला भर रस्त्यात अडून चोरी केली जात आहे. पंधरा दिवसांपूर्वीच मालेगावच्या तालुका पोलिस ठाण्यात चारचाकीतून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला अडवून मारहाण करत पैशांची बॅग लांबवली होती. या घटनेमुळे शहर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. मिळालेली माहिती आणि पाळत ठेवून या चोऱ्या केल्याचं बोललं जातं आहे. या घटना सातत्याने घडत असल्याने पोलीस काय करतायत? असा सवाल संतप्त झालेले नागरिक उपस्थित करत आहेत.
मालेगाव च्या वडनेरकडून कडे जाणाऱ्या रावळगाव रस्त्यावरील सावतावाडी शिवारात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकी वरून जात असताना तीन चोरट्यांनी दुचाकी आडवी लावून जबर मारहाण करत एकाला लुटल्याची ही घटना घडली आहे.
तब्बल सव्वा पाच लाख रुपये पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाकडून लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला आहे.
अत्यंत वर्दळीचा रस्ता असताना रस्ता लुटीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक भिका पाटील हे नियमितपणे वडनेरला बँकेमध्ये भरणा करण्यासाठी दुचाकीवरून जात होते आणि त्या वेळेला आज ही घटना घडली आहे.
दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पाटील यांना दुचाकी आडवी लावून त्यांच्याकडे असलेल्या पिशवीतील संपूर्ण रक्कम बळजबरीने हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली आहे. या संपूर्ण प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून संशयितांचा शोध घेतला जात आहे.