पोलिसांचा नाद नाय करायचा ! जिथं केला राडा तिथंच दिला दणका, नाशिक पोलिसांचा पॅटर्नच वेगळाय…
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात प्राणघातक हल्ले वाढले आहे. त्यामध्ये पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून संशयितांना चांगलाच धडा शिकवला आहे.
नाशिक : मागील आठवड्यामध्ये पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मुंजाबा चौक परिसरामध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेमध्ये प्रेम महाले हा आपल्या मित्रांसोबत उभा असतांना त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी प्रेम महाले याने हल्ला चुकवून आपल्या घराकडे घाव घेत असताना संशयतांनी गोळीबार करत असताना बंदुकीतून निघालेली गोळी प्रेमच्या आईला चाटून गेली होती. त्यामध्ये प्रेम महालेची आई आणि एक श्वान जखमी झाला होता. त्या घटनेनंतर गेले आठ दिवस पोलीस त्या संशयित आरोपींचा शोध घेत होते. अखेर आरोपी हात लागल्यानंतर नंतर त्यांच्याकडून पिस्तूलही जप्त करण्यात आले होते.
पंचवटीतील गोळीबार प्रकरणी संशयित आरोपी विशाल भालेराव, विकी वाघ, संदीप आहिरे, जय खरात यांची पंचवटी पोलिसांनी जिथं त्यांनी गोळीबार करत हल्ला केला तिथेच धिंड काढण्यात आली होती.
गेल्या काही दिवसांपासून पंचवटी पोलिसांना गुंगारा देणारे हे चौघा संशयित आरोपीला चांगलाच धडा शिकवला आहे. दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली असून या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
संशयित आरोपी यांची धिंड काढल्यानंतर पोलिसांच्या कारवाईचे स्वागत होत असतांना पोलिसांनी संशयित आरोपींना पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविला होता. त्यामुळे त्यांना पायी चालणं देखील कठीण झालेले होते.
परिसरातील गुन्हेगारांना यामुळे चांगलाच वचक बसणार असून धिंड काढत असतांना अनेक नागरिकांनी टाळ्या वाजवत पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे. यामध्ये पोलिसांना गुन्हेगार हाती लागत नसल्याने यापूर्वी नाराजीही व्यक्त केली होती.
शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पंचवटी पोलिसांचा हा पॅटर्न संपूर्ण शहरात राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात प्राणघातक हल्ले वाढले असून ते रोखण्यासाठी पोलिसांनी अशीच कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी नागरिक करीत आहे.